स्वच्छ नांदेड–सुंदर नांदेड मोहिमेचा दिखावा? प्रकाराची चौकशी करतो; पालकमंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया नांदेड (प्रतिनिधी) – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड महापालिकेच्या वतीने गुरुवारी ‘स्वच्छ नांदेड–सुंदर नांदेड’ स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. महापौरांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला; मात्र या मोहिमेच्या सुरुवातीलाच महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा परिसरातील स्वच्छ रस्त्यावरच महापालिकेने कचरा आणून टाकल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर याच कचऱ्याची साफसफाई करून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ही स्वच्छता करण्यात आली. स्वच्छ रस्ता आधीच अस्तित्वात असताना तोच रस्ता स्वच्छ दाखवण्यासाठी त्यावर कचरा टाकून पुन्हा तो कचरा उचलण्याचा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली केवळ फोटोसेशन आणि दिखावा करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे.महापालिकेच्या या कृतीमुळे प्रत्यक्ष शहर स्वच्छ करण्याऐवजी स्वच्छता मोहिमेचा देखावाच अधिक महत्त्वाचा ठरला का? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नियमित कचरा संकलन, रस्त्यांची स्वच्छता आणि अस्वच्छतेच्या समस्या कायम असताना उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी चक्क स्वच्छ रस्त्यावर कचरा टाकला जात असेल, तर स्वच्छतेच्या या मोहिमेच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. दरम्यान, हा प्रकार पालकमंत्री अतुल सावे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी, मला याबाबत माहिती नाही, या प्रकाराची चौकशी करतो, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे महापालिकेने स्वच्छ रस्त्यावर कचरा का आणून टाकला, हा कचरा कोणी टाकला आणि त्यामागे नेमका उद्देश काय होता, याची चौकशी होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. स्वच्छतेच्या नावाखाली कचरा निर्माण करून पुन्हा तोच कचरा उचलण्याचा प्रकार खरोखरच स्वच्छ नांदेड–सुंदर नांदेडचा नमुना आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून, महापालिका प्रशासन या प्रकाराबाबत काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नांदेड शहरातील कचऱ्याची खरी परिस्थिती पाहायची असेल, तर तयार केलेला देखावा पाहण्यापेक्षा थेट जमिनीवर उतरून पाहणे गरजेचे आहे. मुंबईतील घाटकोपरचे करोडो रुपयांचे मालक असलेले आमदार पराग शाह दिवसभर मतदारसंघात फिरल्यानंतर त्यांना केवळ 84 रुपये मिळाले, तर मग ते नेमके कशासाठी फिरत होते, हा प्रश्न उपस्थित होतो. आपल्या मतदारसंघातील सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा बनाव केला असेल, तर नांदेडमध्येही असाच प्रयोग करून पाहावा. मात्र यावेळी कॅमेऱ्यासमोरचा तयार देखावा नव्हे, तर प्रत्यक्ष रस्त्यावर, गल्लीबोळात आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये उतरून परिस्थिती पाहावी. कचरा नेमका कुठे साचतो? तो नियमितपणे साफ होतो का? साफ करणारे कर्मचारी प्रत्यक्षात काय करतात? कचरा संकलनाची यंत्रणा किती प्रभावी आहे? आणि या संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख करणारी यंत्रणा नेमके काय करते? या प्रश्नांची उत्तरे कागदावर नव्हे, तर जमिनीवर उतरूनच मिळतील. कारण शहर स्वच्छ असल्याचा देखावा निर्माण करण्यापेक्षा शहर खरोखर स्वच्छ आहे का, हे तपासणे अधिक महत्त्वाचे आहे. कसा बनावट कार्यक्रम करण्यात आला हे पहा व्हिडिओत कचरा काही ठिकाणी आणि इतर सर्वत्र साफसूफ .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-17-at-13.34.44.mp4 Kanthak Suryatal Post Views: 132 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation परभणीतील मटका बुकींवर पोलिसांचा छापा; १२ जणांवर कारवाई;दोन ठिकाणी धाडीत ७५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त ३,५०० कोटींचा मालक, महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत आमदार जेव्हा रस्त्यावर भीक मागू लागला! — पराग शाह यांच्या त्या ४ तासांच्या प्रयोगाची इनसाइड स्टोरी!