नांदेड (प्रतिनिधी) – आज शहरात महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठा पोलिसांचा ताफा, फौजफाटा आणि बुलडोझर मशिनी घेऊन ठिकठिकाणी कारवाईचा मोठा आव आणला. शहरात अनेक ठिकाणी झालेली लहान-सहान अतिक्रमणे काढल्याचा शूरपणा महापालिकेने दाखवला. परंतु, ज्या ठिकाणी ही धडक कारवाई झाली, त्याच्या अगदी शेजारीच रिलायन्स मार्केटने चक्क ४ फूट रुंद आणि तब्बल ४०० फूट लांब असलेला अख्खाच्या अख्खा फूटपाथच गिळंकृत केला आहे. संपूर्ण फूटपाथच नजरेसमोरून गायब झाला असतानाही, महापालिकेच्या या शूरवीर अधिकाऱ्यांना आणि भव्य कारवाई पथकाला हे एवढे मोठे अतिक्रमण मात्र अजिबात दिसले नाही, याचे खरोखरच नवल वाटायला हवे. महापालिकेच्या या चष्म्याला नेमका कसला रंग चढला आहे आणि त्यांना हे भलंमोठं अतिक्रमण का दिसले नाही, याचे कारण शोधण्यापेक्षा पालिकेचा हा उघडा पडलेला दुटप्पीपणा पाहणे जास्त गरजेचे आहे. दिवसभर रस्त्यावर उन्हातान्हात उभे राहून, प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या रस्त्यावरील गरीब हातगाडीवाल्यांना ही महापालिका कधीही साधी गाडी लावू देत नाही. गरिबांच्या गाड्यांचा, त्यांच्या रोजच्या मोदकांचा आणि कमाईचा हिशोब ठेवण्यास पालिकेचे अधिकारी नेहमीच तत्पर असतात. एवढेच नव्हे, तर एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने आपल्या घरासमोर फूटपाथवर किंवा रस्त्यावर एखादी साधी वस्तू जरी ठेवली, तरी पालिकेचे पथक ती वस्तू तत्काळ उचलून नेण्यासाठी लगेच धावून येते. परंतु, दुसरीकडे ४ ते ५ फूट रुंद आणि तब्बल ४०० फूट लांब असलेला संपूर्ण फूटपाथ एका बड्या रिलायन्स वाल्याने खाऊन टाकला, तरी पालिकेचे लक्ष तिकडे अजिबात जात नाही. हा भलामोठा फूटपाथ अचानक कसा गायब झाला, याचा शोध आता नक्की कोण घेणार? महापालिका तर गाढ झोपलेली आहे, मग आता सर्वसामान्य जनतेने स्वतः रिलायन्स वाल्याच्या दारात जाऊन विचारायचे का, की तुम्ही आमचा रस्ता खाल्ला आहे का आणि तुम्ही आम्हाला बोलू वा चालू देणार आहात की नाही? लहान-सहान गरिबांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या आणि बड्यांच्या अतिक्रमाकडे सोयीस्कर डोळेझाक करणाऱ्या या झोपलेल्या महापालिकेला जागी करण्यासाठीच हा खोचक सवाल उपस्थित करण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,002 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नागरिक सुरक्षा, सायबर फसवणूक आणि महिला सुरक्षेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे महत्त्वपूर्ण आवाहन इंदरजितसिंग बावरी खून प्रकरणात दोन महिलांसह सहा जणांना मकोका पोलीस कोठडी