नांदेडच्या इतवारा बाजारात मनपाचा अंधेरी कारभार; रुग्ण आणि महिला त्रस्त, प्रशासन अजूनही सुस्त!
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमधील इतवारा बाजारातील अतिक्रमणाचा आणि अस्वच्छतेचा प्रश्न आता इतका गंभीर बनला आहे की, स्थानिक मनपा प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचे कौतुक करावे तितके कमीच आहे. दोन वर्षांपासून स्थानिक रहिवासी आणि विशेषतः चाळीस ते पंचेचाळीस महिला प्रशासनाचे उंबरठे झिजवून थकल्या आहेत, पण नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि आयुक्त डोईफोडे यांच्या कर्तव्यदक्ष कानांवर अद्याप जुईही सरकलेली नाही. या समस्येकडे इतक्या कौशल्याने कानाडोळा केला आहे की, नागरिक आता या सुस्त कारभाराला कंटाळले आहेत.
डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर अश्लील चाळे आणि सडक्या भाजीपाल्याची मोफत भेट!
हनुमान मंदिर परिसरातील धन्वंतरी क्लिनिकचे डॉ. दिलीपकुमार शिवाल हे गेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. परंतु, सध्या त्यांच्या क्लिनिकच्या मुख्य दरवाजासमोरच भाजी विक्रेत्यांनी आपले गाडे लावून रुग्णांना प्रवेश बंद केला आहे. इतकेच नव्हे तर, क्लिनिकमध्ये येणाऱ्या महिला रुग्णांकडे पाहून अश्लील चाळे केले जात असल्याने, अनेक वर्षांपासून नियमित येणाऱ्या महिला रुग्णांनी सुरक्षेअभावी डॉक्टर साहेबांकडे येणेच बंद केले आहे. या अनोख्या त्रासामुळे डॉक्टरांच्या व्यवसायावर अगदी अनिष्ट परिणाम झाला आहे. संध्याकाळी जाताना शिल्लक राहिलेला सडका भाजीपाला क्लिनिकसमोर फेकून देऊन डॉक्टर साहेबांना सुवासिक घाणीचे साम्राज्य भेट म्हणून दिले जाते. एकवेळची कारवाई आणि जशास तशी परिस्थिती! या त्रासाला कंटाळून केवळ हिंदू रहिवासीच नव्हे, तर मक्का मशीद, सराफा असोसिएशन आणि खुद्द स्थानिक मुस्लीम व्यापाऱ्यांनी देखील अनेक निवेदने दिली आहेत. यावर प्रशासनाने अत्यंत धडक कारवाई करण्याचा एक देखावा केला खरा, पण दुसऱ्याच दिवशी अतिक्रमण जशास तसे पूर्ववत झाले. मनपाच्या या एक दिवसीय कारवाईच्या फार्समुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धैर्य अधिकच बळावले असावे.
सुरक्षेचा रामभरोसे कारभार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न! हा परिसर संवेदनशील असून वाहतूक कोंडीवरून रोज येथे भांडणे होत आहेत. रात्रीच्या वेळी या परिसरात अनोळखी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्याने स्थानिक महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, सीसीटीव्ही लावणे किंवा रात्रीची पोलीस गस्त वाढवणे या साध्या गोष्टी करायलाही प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. आता शेवटी महिलांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निवेदने पाठवली आहेत. तरीही नांदेडचे प्रशासन गाढ झोपेतून जागे होणार की, एखाद्या मोठ्या अनुचित घटनेची किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची वाट पाहत आहे, असा बोचरा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
