५० किलोच्या पोत्यातून ३ किलो कुठे गायब? नांदेड (प्रतिनिधी): -गरिबांच्या ताटात पोहोचणाऱ्या रेशनच्या धान्याच्या वितरणातच गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य राहुल मधुकरराव सोनसळे यांनी केला आहे. शासकीय गोदामातून निघणाऱ्या धान्याच्या वजनापासून ते रास्त धान्य दुकानापर्यंत पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात तफावत होत असल्याचा दावा करत त्यांनी पुरवठा विभागाच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवेदनात केलेल्या आरोपानुसार, वेअरहाऊसमधून ५० किलो ५०० ग्रॅम वजनाची धान्याची पोती उचलली जात असताना दुकानदाराला प्रत्यक्षात ४७ किलोच धान्य दिले जाते, असा गंभीर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित साडेतीन किलो धान्य नेमके कुठे जाते? याचा हिशेब कोण देणार? असा सवाल नगरसेवक राहुल सोनसळे यांनी उपस्थित केला आहे. ‘गरिबांच्या हक्काच्या धान्यावर कोणाचा डोळा?’ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या समावेशापासून धान्य वाहतूक, हमाल पुरवठा आणि वितरणापर्यंतच्या प्रक्रियेत अनियमितता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धान्याची अफरातफर करून ते काळ्या बाजारात वळविले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, शासकीय गोदामातील प्रत्यक्ष साठा आणि कागदोपत्री नोंदी यांची काटेकोर तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गरिबांच्या हक्काचे धान्य जर काळ्या बाजारात जात असेल, तर हा केवळ गैरप्रकार नसून गरिबांच्या हक्कावरचा घाला आहे, अशी भूमिका सोनसळे यांनी मांडली आहे. अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करा नांदेड तालुका पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड आणि जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश भारदेवाड यांच्या कार्यकाळातील कामकाजाची कार्यालयीन चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीदरम्यान कोणताही प्रभाव पडू नये, यासाठी त्यांना तत्काळ अन्यत्र हलविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. रास्त धान्य दुकानदारांना चौकशीच्या नावाखाली धमकावले जात असल्याच्या तक्रारींचीही चौकशी करावी, तसेच वाहतूकदार व हमाल पुरवठा ठेकेदारांच्या कामकाजाची स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी सोनसळे यांनी केली आहे. रेशन व्यवस्थेतील प्रत्येक किलो धान्याचा हिशेब जनतेसमोर आला पाहिजे. गरिबांच्या हक्काच्या धान्यात गैरप्रकार आढळल्यास संबंधित कितीही मोठा अधिकारी किंवा ठेकेदार असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राहुल सोनसळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे केली आहे. या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येणार का आणि रेशन धान्याच्या अफरातफरीमागे नेमके कोण आहे, याकडे आता नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,178 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जेन झी नंतर आता जेन-अल्फाचा विद्रोह भाजपशासित राज्यांतील प्रशासकीय अपयशाचा आरसा रात्री १२:३० चा तो भयंकर यू-टर्न! भाजप खासदार मनन मिश्रांनी विद्यार्थ्यांपुढे टेकले गुडघे?