• *12 दिवसांत 1 लाख 9 हजारांहून अधिक भाविकांची आरोग्य तपासणी* • *1407 आरोग्य शिबिरांचे आयोजन* • *महिला व बालकांच्या आरोग्य तपासणीवर विशेष भर* • *विविध विभागांच्या समन्वयातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी* नांदेड (जिमाका) – गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. 14 ते 25 सप्टेंबर या 12 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात 1 हजार 407 आरोग्य शिबिरांचे आयोजन करून 1 लाख 9 हजार 109 भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या नियोजनातून हे अभियान राबविण्यात आले. अभियानांतर्गत भाविकांना विविध वैद्यकीय तपासण्या, आवश्यक उपचार, पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन तसेच शासकीय आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. या अभियानात 46 हजार 95 पुरुष, 49 हजार 145 महिला आणि 13 हजार 869 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध वैद्यकीय विभागांच्या माध्यमातून भाविकांची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार व पुढील वैद्यकीय सेवांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय विभागनिहाय तपासणीमध्ये मेडिसिन विभागात 59 हजार 811, बालरोग विभागात 13 हजार 869, स्त्रीरोग विभागात 6 हजार 579, अस्थिरोग विभागात 5 हजार 844, नेत्ररोग विभागात 3 हजार 458, त्वचारोग विभागात 3 हजार 391, कान-नाक-घसा विभागात 3 हजार 413, तर शल्यचिकित्सा विभागात 1 हजार 881 भाविकांची तपासणी करण्यात आली. याशिवाय 2 हजार 212 भाविकांची आयुष्मान भारत व आभा कार्डासाठी नोंदणी करण्यात आली. यामुळे आरोग्य तपासणीसोबतच पात्र लाभार्थ्यांना शासकीय आरोग्य योजनांशी जोडण्यास मदत झाली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय परके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत रिटे यांच्या योगदानातून सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या अभियानात जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महानगरपालिका आरोग्य विभाग, श्री गुरु गोविंदसिंगजी स्मारक सामान्य रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालये तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न खासगी रुग्णालयांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने डॉ. चंद्रकांत मुंडे, वैद्यकीय अधिकारी, गजानन वानखेडे, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) आणि संभाजी लोंढे, वैद्यकीय समन्वयक यांनी संबंधित संस्थांमध्ये समन्वय साधून अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी योगदान दिले. भाविकांच्या दारी आरोग्यसेवा गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या दारी आरोग्यसेवा पोहोचविणे, आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान करणे, आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे आणि पुढील वैद्यकीय सेवांसाठी मार्गदर्शन करणे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या अभियानामुळे जिल्ह्यातील हजारो भाविकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. शासकीय आरोग्य यंत्रणा आणि विविध वैद्यकीय संस्थांच्या समन्वयातून नागरिकांना सुलभ व परिसरातच आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. Kanthak Suryatal Post Views: 69 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बातमी नव्हे, लोकशाहीच्या आजाराचे लक्षण: इंडियन एक्स्प्रेसचा खळबळजनक तपास