परिधानमंत्र्यांची Gen Z स्टाईल आणि ४ लाख विणकरांचे पलायन: एक विदारक वास्तव!
आजकाल आपल्या देशात रीलचा खेळ जोरात आणि सत्याचा गळा जोरात आवळला जातोय, असं चित्र दिसतंय. पंतप्रधान मोदींच्या नव्या कोऱ्या रीलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या वेळी खोलीत फिरतानाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना वाटलं असेल की, साहेब काहीतरी मोठं गुपित सांगणार आहेत, पण तिथे तर Gen Z भाषेचा तडका दिला गेला होता.
पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात GRWM (Get Ready With Me) असा शब्द वापरला. आता ज्या देशात ८०% हून अधिक जनतेला या शब्दाचा अर्थच ठाऊक नाही, तिथे असा शब्द वापरून नक्की कोणाला कनेक्ट केलं जातंय? कदाचित साहेबांच्या सल्लागारांनी सांगितलं असेल की, येणाऱ्या निवडणुकीत तरुण पिढीला आकर्षित करायचं असेल, तर हीच ट्यूशन घेणं गरजेचं आहे. पण या रीलच्या झगमगाटात हॅंडलूम क्षेत्राची विदारक रिअलिटी पार वाहून गेली आहे.
वाराणसी – पंतप्रधानांचा स्वतःचा मतदारसंघ! तिथली अवस्था बघितली तर अंगावर काटा येईल. सरकारी आकड्यांनुसार, आधी देशात ४३ लाख विणकर होते, ते आता फक्त २६ लाख ७४ हजारांवर आले आहेत.परिधानमंत्री रील बनवण्यात मग्न असतानाच बनारसच्या साड्यांचा अस्सल ताणाबाणा नकली साड्यांनी ओरबाडून काढला आहे. बनारसमध्ये तब्बल ५०० हून अधिक मशीन बंद पडल्या असून सुमारे ४ लाख विणकरांनी पलायन केलंय. ज्यांच्या हाताला काम हवं होतं, त्यांची मुलं आज जगण्यासाठी रिक्षा किंवा स्कूटर चालवत आहेत.

पंतप्रधान म्हणतात की, हॅंडलूमचे कपडे खरेदी करून GRWM व्हिडिओ बनवा. पण साहेब, जनता जे सामान खरेदी करेल ते अस्सल आहे की नकली, हे ओळखणार कसं? बाजारात नकली साड्यांचा असा काही सुळसुळाट झालाय की ग्राहकांची फसवणूक होतेय आणि अस्सल कारागीर मात्र देशोधडीला लागलाय.
दुसरीकडे, राहुल गांधींनी जेव्हा या विणकरांची भेट घेतली, तेव्हा समोर आलेली परिस्थिती अधिकच मार्मिक होती. विणकरांना फुफ्फुसाचे आजार होतायत, पण सरकारकडून कोणतंही आरोग्य पॅकेज नाही. अमेरिका आणि इतर देशांच्या टॅरिफ धोरणांमुळे भारतीय विणकर पाकिस्तान, नेपाळ आणि तुर्कीसारख्या देशांसमोर टिकू शकत नाहीत. ६०% व्यापार ठप्प झालाय आणि त्यातला ४०% तर कायमचा बंद पडलाय.
चमकदार रील आणि खोट्या घोषणांनी विणकरांचे खिसे भरत नसतात. गरज आहे ती बनावट साड्यांच्या बाजारावर लगाम लावण्याची आणि विणकरांच्या प्रश्नांना रिअल मध्ये भिडण्याची. साहेब, कॅमेऱ्यासमोरून थोडं बाजूला होऊन या गरिबांच्या उध्वस्त झालेल्या लुम (मागा) कडे बघा, तिथे तुम्हाला खरी कहाणी समजेल. आत्मनिर्भर बनवण्याची भाषा करणं सोपं आहे, पण जेव्हा चिरागाखालीच अंधार असतो, तेव्हा मेक इन इंडियाचा प्रकाश फक्त रीलपुरताच मर्यादित राहतो.
आता सांगा, तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधानांनी रीलमधून बाहेर पडून विणकरांच्या रिअलिटीकडे लक्ष द्यायला नको का? कमेंटमध्ये नक्की सांगा!

