नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाकडून माहिती अधिकार (RTI) कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समोर आला आहे. महापालिका हद्दीतील मोकळ्या जागांवरील (ओपन स्पेस) अतिक्रमणासंदर्भात मागविलेली माहिती नियोजित मुदतीत न दिल्यामुळे अर्जदार स. जगदिप सिंघ मोहन सिंघ नबंरदार यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, अर्जदारांनी १७ जून २०२६ रोजी माहिती अधिकार कायदा, २००५ च्या कलम ६(१) अंतर्गत मालमत्ता विभागाकडे अर्ज सादर केला होता. या अर्जामध्ये नांदेड मनपा हद्दीतील एकूण ओपन स्पेसची संख्या व ठिकाणे, महापालिकेने ताब्यात घेतलेल्या मोकळ्या जागांची माहिती, अतिक्रमित ओपन स्पेसची संख्या तसेच अशा अतिक्रमणांवर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील मागविण्यात आला होता. माहिती अधिकार कायद्यानुसार ३० दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक असतानाही महिनाभर उलटूनही कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जदाराने चौकशी केली असता जनमाहिती अधिकारी नवनाथ स्वामी यांच्याकडे मूळ अर्ज उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अर्जाची छायाप्रत घेऊन ती सहायक जनमाहिती अधिकारी मनोहर दंडेवाड यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही वारंवार पाठपुरावा करूनही माहिती देण्यात आलेली नाही. कामाचा ताण आहे, उद्या-परवा या,अशी उत्तरे देत टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. तसेच दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अर्जदारांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार सादर करून मागितलेली माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याची तसेच माहिती अधिकार कायद्याचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. Kanthak Suryatal Post Views: 760 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध;शिक्षणमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी वीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक; चुकीच्या रिडींगमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री