डावी लोकशाही आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने;राष्ट्रपतींना निवेदन
नांदेड(प्रतिनिधी)-नीट परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराचा तीव्र निषेध करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पदावरून हकालपट्टी करावी, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी तसेच नीटसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर व पारदर्शक यंत्रणा उभारावी, या मागण्यांसाठी डावी लोकशाही आघाडीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारताच्या राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीमार हा लोकशाही मूल्यांवर आघात करणारा असून, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागून भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची पेपरफुटी अथवा गैरप्रकार होणार नाहीत, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भाकप (माले), समाजवादी पक्ष, लोक स्वराज्य, सीटू, आयटक, एसएफआय, डीवायएफआय, शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, एमपीजे तसेच विविध डाव्या व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.निवेदनावर कॉ. प्रदीप नागापूरकर (भाकप), कॉ. विजय गाभणे (भाकप), डॉ. पी. डी. पाटोदेकर (समाजवादी पक्ष), प्रा. गौतम दुथडे, अल्ताफ हुसेन (एमपीजे), प्रा. मंगेश देवकांबळे, प्रा. आदिनाथ इंगोले, सुनील अनंतवार, कॉ. बी. के. पांचाळ, कॉ. दिगंबर घायाळ (भाकप-माले), कॉ. देवराव आईलवार, कॉ. भगवान नाईक, कॉ. गंगाधर गायकवाड (भाकप), कॉ. शिवाजी फुलवळे (भाकप), श्री. बालाजी पाटोळे (लोक स्वराज्य), कॉ. उज्वला पडलवर (सीटू), कॉ. वैशाली धुळे (भाकप), कॉ. मीना हटकर (आयटक), कॉ. अब्दुल गफार (शेतमजूर युनियन), कॉ. प्रफुल्ल कडकक्कर (एसएफआय), कॉ. विनोद गोविंदवार (शेतमजूर युनियन), कॉ. देवराव नारे (शेतमजूर युनियन), कॉ. गणेश सांडूपटला (आयटक), कॉ. लता गायकवाड (जनवादी महिला संघटना), कॉ. करवंदा गायकवाड (सीटू), कॉ. श्याम आमराई (डीवायएफआय) व कॉ. जय गायकवाड (डीवायएफआय) यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
