किनवट (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या बनावट तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत रामनगर परिसरातील एका टिनशेडवर छापा टाकला. या कारवाईत बनावट तंबाखूजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन, तंबाखू, चुना, सुपारी, पॅकिंग साहित्य व इतर साहित्य असा एकूण ₹५१ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने ७ जुलै रोजी सकाळी रामनगर येथील टिनशेडवर छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ५९ अन्वये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये गजानन नारायण बैनवाड, राहुल किशन नरोटे, श्रीकांत इरबाजी वाघमारे, विनायक सुभा देणेवार, नकुल संतोष भंडारे, दिलीप मलया राम शेट्टीवार आणि शिवा विनोद बेल्सलवार (सर्व रा. किनवट) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात संबंधित आरोपी आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास घातक ठरणारे बनावट तंबाखूजन्य पदार्थ तयार करून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फडेवार करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाबुराव भरकाडे, पोलीस कर्मचारी मणिराम आडे, शाम चव्हाण व पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, किनवट उपविभाग शंभर टक्के अवैध धंदेमुक्त करण्याच्या उद्देशाने नागरिकांनी अवैध व्यवसायांबाबत माहिती ९९७५६७९७३३ या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 575 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोहा शहरात थरार: कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार; आरोपी पती फरार घोरबांडने उस्माननगर येथे किराणा दुकान फोडून रोकडसह साहित्याची चोरी केली