नांदेड – जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10 लाख 72 हजार 885 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी दिली.
पुणे-फुगेवाडी येथे मिथेनॉल मिश्रित हातभट्टी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात 29 मेपासून अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली. तसेच 2 जूनपासून ‘हातभट्टीमुक्त नांदेड जिल्हा’ मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, सहआयुक्त आणि विभागीय उपआयुक्त यांच्या निर्देशानुसार अधीक्षक एस. एल. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि भरारी पथकांनी 29 मे ते 8 जून या कालावधीत ही कारवाई केली.
या कालावधीत एकूण 140 गुन्हे नोंदविण्यात आले असून 137 वारस प्रकरणे दाखल करण्यात आली. 142 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान 1 हजार 98 लिटर हातभट्टी दारू, १३१२० लीटर रसायन, 242.26 लिटर देशी मद्य, 8.10 लिटर विदेशी मद्य, 3 लिटर बिअर आणि 1 हजार 746 लिटर ताडी जप्त करण्यात आली. याशिवाय तीन वाहनेही जप्त करण्यात आली.
सराईत गुन्हेगारांविरोधातही विशेष कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 93 अंतर्गत 39 प्रकरणे दाखल करण्यात आली असून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र दिल्यानंतरही गुन्हे करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध बंधपत्र उल्लंघनाची कारवाई करण्यात आली आहे. अशा आरोपींना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृती कायदा (एमपीडीए) अंतर्गत एका आरोपीविरुद्ध कारवाई करून त्याला थेट कारागृहात पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 5 जून 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत निरीक्षक जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, लक्ष्मण पाटील, श्री. सरकाळे, तसेच कार्यकारी दुय्यम निरीक्षक सचिन शेट्टे, अमित वालेकर, रामप्रसाद पवार, अमित आढळकर, सुमेध चव्हाण, संदीप देशमुख, श्रीमंत बोरुडे, अमोल शिंदे, रेणुका सलगर, मोनिका पाटील, भरारी पथकातील रमेश राठोड, एकनाथ फडणीस आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच अवैध, बनावट किंवा परराज्यातील मद्याची विक्री अथवा साठा असल्याची माहिती नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन अधीक्षक एस. एल. कदम यांनी केले आहे. यासाठी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-833-3333 आणि व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 उपलब्ध आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग भविष्यातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबवून अवैध मद्यव्यवसायावर आळा घालण्यासोबतच शासनाच्या महसूलवाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
