जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या तीन घटना; लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) –  जिल्ह्यातील उमरी, मुखेड आणि लोहा येथे घरफोडी व चोरीच्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, सोने आणि मालासह एकूण लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

उमरी तालुक्यातील जामगाव येथे घरफोडी उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामगाव शिवारात असलेल्या शिवतेज ऑईल मिलचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. ही घटना ८ जून रोजी सायंकाळी ५.३० ते ९ जून रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान घडली. चोरट्यांनी मिलमधील ४५ पोते शेंगदाणे व तेलाचे ड्रम असा सुमारे ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी स्वप्निल रामेश्वर वाघमारे (रा. रामनगर, ता. मुखेड) यांच्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(४), ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेसमोरून १५ हजारांची बॅग चोरी मुखेड येथील एसबीआय बँकेसमोर ९ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास चोरीची घटना घडली. दत्ता नानाजी वाडीकर (वय ५३, रा. उमरखेड) हे बँकेत चलन भरण्यासाठी आले असता त्यांच्या मोटारसायकलच्या हँडलला अडकविलेली १५ हजार रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोहा बसस्थानकावरून सोन्याचे गंठन लंपास लोहा बसस्थानक परिसरात ९ जून रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास आणखी एक चोरीची घटना घडली. फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी हेमंत दिलीपराव रुद्रवार (रा. धारूर, जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!