नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील वजीराबाद भागात एका मोठ्या भूखंड घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील स.न. २४ मध्ये १९८८ च्या मंजूर लेआऊटमधील १० मीटर रुंदीचा सार्वजनिक रस्ता भूमाफियांनी पूर्णपणे गिळंकृत केला असून, त्यावर बेकायदेशीररीत्या टोलेजंग इमारती उभारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम हिरावत जैन यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण? गजानन कमर्शियल कॉर्पोरेशन, नांदेड यांनी १९८८ मध्ये तयार केलेल्या आणि महानगरपालिकेने मंजूर केलेल्या लेआऊट नकाशात पश्चिम बाजूला १० मीटर रुंदीचा सार्वजनिक रस्ता दर्शवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्यावर प्लॉट क्र. १६६, १८०, १८१, १९७, १९८, १९९, २०६, २०५ आणि २० या धारकांनी बेकायदेशीर अतिक्रमणे करून रस्ताच गायब केला आहे.
रस्त्यावरच उभ्या राहिल्या सात मजली इमारती तक्रारीनुसार, प्लॉट क्र. १९७ वर सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे, तर प्लॉट क्र. १८० वर दोन मजली इमारत उभी राहिली आहे. काही ठिकाणी बोअरवेल खोदून आणि कंपाऊंड वॉल बांधून सार्वजनिक रस्ता अडवण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या येण्या-जाण्याच्या मूलभूत हक्कावर गदा आली असून, भविष्यात आग लागल्यास किंवा आरोग्य आणीबाणी उद्भवल्यास अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांसारख्या सेवा पोहोचणे अशक्य झाले आहे.

प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि जमीन मालकांनी विक्रीखतामध्ये (Sale Deed) रस्त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. नगररचना विभागाकडून खोटी माहिती देऊन बांधकामाच्या परवानग्या मिळवण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
सार्वजनिक आरक्षणेही धोक्यात केवळ रस्ताच नाही, तर या लेआऊटमधील शाळा, मोकळी जागा आणि स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या जमिनींमध्येही बेकायदेशीर फेरफार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या ‘आरक्षण क्र. ७’ च्या जागेवर सध्या कृष्णकुंज रेसिडेन्सी हा अपार्टमेंट प्रकल्प उभारण्यात आला आहे, असे स्रोतांमधून दिसून येते.
न्यायालयात धाव घेण्याचा इशारा या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्व अतिक्रमणे हटवावीत आणि जबाबदार अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास माननीय उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा गौतम जैन यांनी दिला आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयालाही पाठवण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीची नावे गजानन कमिशयल कॉपरेशन नांदेडचे भागीदार जय योगद्रपाल बरारा वय ४२ वर्ष रा. वजिराबाद नांदेड,नितीन प्रेमराज आगळे वय ४८ वर्ष आणि आ. राजेश संभाजी पवार वय ४८ वर्ष रा. फुले नगर नांदेड अशी लिहलेली आहेत. पण हा अर्ज गौतम हिरावत यांनी महानगर पालिकेकडे १४ एप्रिल २०२६ रोजी दिला असताना आज ९ जून २०२६ रोजी व्हाट्सअप चॅनल वर सार्वजनिक केला आहे.

