भारतीय लोकशाहीच्या महानाटकात सध्या बंगाल चॅप्टर जोरात सुरू आहे. २४ तासांपूर्वी दिल्लीच्या दरबारात आणि न्यूज चॅनल्सच्या स्टुडिओमध्ये एकच चर्चा होती ममता बॅनर्जी संपल्या! जणू काही मोदी आणि शहा यांच्या जादूच्या कांडीने ममतांचेही उद्धव ठाकरे किंवा शरद पवार झालेच होते. पण विसरू नका, हा बंगाल आहे आणि इथे खेला होबे हा केवळ नारा नसून तो ममता दीदींचा लाईफस्टाईल आहे. बंडखोरांचे मार्गदर्शक स्वप्न आणि वास्तवाचा चटका पक्षातील ५८ आमदार जेव्हा सभापतींकडे जातात आणि स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा सामान्यतः कोणताही नेता हतबल होतो. पण ममता बॅनर्जी या काही साध्यासुध्या नेत्या नाहीत. त्या रस्त्यावरच्या फायटर आहेत. जेव्हा त्यांचे ५८ शिलेदार फुटले, तेव्हा दीदींनी काय करावे? त्यांनी सरळ महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करायला सुरुवात केली. गांधीजी आणि टागोर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन उभं राहणं ही केवळ औपचारिकता नसते, तर ती संघटनात्मक ऊर्जेची बॅटरी चार्जिंग असते. दुसरीकडे, बंडखोर गटाचे म्होरके ऋतव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा यांनी एक भारी चाल खेळली. त्यांनी जाहीर करून टाकलं की, ममता दीदी आमच्या नेत्या नाहीत, तर त्या आता केवळ मार्गदर्शक (Advisor) राहतील. भारतीय राजकारणात मार्गदर्शक होणे याचा अर्थ काय असतो, हे लालकृष्ण अडवाणींशिवाय चांगलं कुणाला ठाऊक असेल? थोडक्यात काय, तर दीदींना अडवाणींच्या रांगेत नेऊन बसवण्याचा हा प्रयत्न होता. पण बंडखोरांच्या या स्क्रिप्टमध्ये एक मोठा लोचा झाला. एक फोन कॉल आणि टायगर अभी जिंदा है ज्या नेत्याच्या बैठकीला पहिल्या वेळी १५-२० आमदार येत नाहीत, दुसऱ्या वेळी ६० आमदार गायब असतात, अशा वेळी तिसरी बैठक बोलावणं म्हणजे राजकीय आत्महत्याच! पण ममता दीदींनी हा धोका पत्करला. त्यांनी फक्त एक फोन कॉल केला. हो, तोच तो रहस्यमय फोन कॉल, ज्याने बंगालची बाजीच पालटली. दीदींनी काही बंडखोर आमदारांना स्वतः फोन लावला आणि कदाचित त्यांना त्यांच्या जुन्या दिवसांची किंवा ईडीच्या फाईल्सची आठवण करून दिली असावी. या एका फोनचा परिणाम असा झाला की, हावडा जिल्ह्याचे आमदार गुलशन मलिक, जे बंडखोरांच्या गोटात सही करून बसले होते, अचानक जागे झाले. ते म्हणाले, ममता दीदी मार्गदर्शक असतील तर आम्हाला ते मान्य नाही, त्या आमच्या नेत्याच हव्या आहेत! म्हणजे बंडखोरांना असं सांगून गोळा केलं होतं की, आपला लढा फक्त अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात आहे, दीदींच्या नाही. बिचाऱ्या बंडखोरांना वाटलं होतं की ते फक्त भाच्याला हटवत आहेत, पण त्यांना कळलं की इथे तर काकूलाच रिटायर करण्याची तयारी सुरू आहे. हा तर शुद्ध फसवणुकीचा आणि ‘मक्कारीचा’ प्रकार झाला, असे आता हे आमदार म्हणू लागले आहेत. भाजपची घाई आणि दिल्लीचा प्लॅन दिल्लीत बसलेल्या चाणक्यांना वाटलं होतं की, महाराष्ट्रानंतर आता बंगालची बारी आहे. ममता बॅनर्जींची पार्टी आता संपलीच,असा ढोल वाजवायला त्यांनी सुरुवात केली होती. दिनेश शर्मांसारखे नेते, ज्यांना कदाचित बंगालचा नकाशाही नीट माहीत नसेल, ते आता टीएमसीला भ्रष्टाचारी लोकांचा समूह म्हणत आहेत. किती हा विरोधाभास! याच ममता बॅनर्जी जेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होत्या, तेव्हा भाजप त्यांना विमानतळावर रिसीव्ह करायला जायचा. पण आज त्या त्यांच्यासाठी अराजकतावादी झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षिततेचे विक्रम प्रस्थापित करणारे नेते जेव्हा बंगालमधील महिला अत्याचारावर बोलतात, तेव्हा ती लोकशाहीतील सर्वात मोठी कॉमेडी वाटते. पण भाजपची खरी नजर आहे ती २४ खासदारांच्या आकड्यावर. चर्चा अशी पसरवली गेली की २० खासदार फुटणार आहेत आणि मोदीजी आता परिसीमन विधेयक आरामात मंजूर करून घेणार आहेत. पण या स्वप्नाळू वातावरणात ममतांनी आपली सेना तयार ठेवली आहे. शहानवाज अली, युसूफ पठाण, महुआ मोइत्रा यांसारखे २८ पैकी १३-१४ शिलेदार तर दीदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, ज्यांनी निरोप धाडलाय की पूर्ण पार्टी गेली तरी आम्ही तुमच्यासोबत राहू! काँग्रेसचा स्कोप आणि अधीर रंजनांची अधीरता या सगळ्यात सर्वात मजेशीर पात्र म्हणजे अधीर रंजन चौधरी. टीएमसी संपत चालली आहे हे पाहून त्यांना काँग्रेससाठी मोठा स्कोप दिसू लागला आहे. राहुल गांधी तिकडे दिल्लीत म्हणतात की ही मतांची चोरी आहे, आणि अधीर बाबू इकडे बंगालमध्ये म्हणतात की हे जनतेचे आक्रोश आहे. यांच्यातलं हे को-ऑर्डिनेशन पाहूनच कदाचित काँग्रेस आज या स्थितीत पोहोचली असावी. वाघ जखमी झालाय हे पाहून कोल्ह्यांनी शिकारीची स्वप्ने पहावीत, तशी काहीशी अधीर बाबूंची अवस्था झाली आहे. आता पुढे काय? सध्याची परिस्थिती पाहता, ममतांनी बाजी फिक्स केल्यासारखे वाटतेय. जर ५८ पैकी १० आमदारही परत आले, तर बंडखोरांचा आकडा ५४ च्या खाली जाईल आणि पक्षांतर बंदी कायदा त्यांच्या गळ्याचा फास बनेल. मग एकतर त्यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा गपगुमान दीदींच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागेल. ममतांनी हार मानलेली नाही. त्यांनी संघटनेचे सर्व पदाधिकारी बरखास्त करून सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेतली आहेत. त्या बंडखोरांना शिव्या देत नाहीत, तर म्हणतात ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान. म्हणजे बंडखोरांना सन्मती मिळावी की त्यांना ईडी पासून मुक्ती मिळावी, हे दीदींनाच ठाऊक! शेवटी, बंगालचा हा खेळ अजून संपलेला नाही. आजची आमदारांची बैठक खूप महत्त्वाची आहे. शुभेंदु अधिकारी आणि भाजपचे नेते हे ५८ चा आकडा टिकवून ठेवण्यासाठी जंगजंग पछाडतील, तर ममता दीदी त्यांचा तो एक फोन कॉल पुन्हा फिरवतील की नाही, यावर सर्वांचे लक्ष आहे. महाराष्ट्रात जे सेनापती (एकनाथ शिंदे, अजित पवार) स्वतःच्या फौजेसह निघून गेले, तसे ममतांच्या बाबतीत घडणे कठीण आहे, कारण इथे सेनापती ममता स्वतःच आहेत. लोकशाहीचा हा खेळ असाच सुरू राहील. कोणाचे मुकुट पडतील आणि कोणाचे तख्त टिकेल, हे येणारा काळच सांगेल. तोपर्यंत मार्गदर्शक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणि ‘स्कोप’ शोधणाऱ्यांना आमचा प्रेमळ नमस्कार! Kanthak Suryatal Post Views: 687 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी;विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता नियमबाह्य वाहन किरायावर देण्याचा पत्रकाराचा प्रकार; कार्यकारी संपादक असल्याचे सांगून नियमांना हरताळ?