नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे प्रवास म्हणजे वेळेची शाश्वती आणि सुरक्षिततेची हमी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र ६ मे रोजी नांदेड येथून पनवेलकडे जाणाऱ्या १७६१४ एक्सप्रेस गाडीने अनेक प्रवाशांच्या आयुष्यात अक्षरशः गोंधळ आणि भावनिक धक्का निर्माण केला. नियोजित वेळेनुसार सायंकाळी ६:२० वाजता सुटणारी ही गाडी तब्बल साडेतीन तास उशिराने, रात्री ८:५० वाजता स्थानकातून रवाना झाली. वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक प्रवासी आधीच रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. प्लॅटफॉर्मवरील फलकावर वारंवार ‘री-शेड्युल’ असा संदेश झळकत होता, मात्र नेमका उशीर का झाला याची स्पष्ट माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली नाही. चौकशी केंद्रावर विचारणा करणाऱ्या प्रवाशांना केवळ गाडी ८:५० ला सुटेल एवढेच उत्तर मिळत होते. या अनिश्चिततेमुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता, संताप आणि निराशा वाढत गेली. गाडीत बसलेल्या अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण या विलंबामुळे हुकले. काही प्रवासी पुण्यातील लग्न समारंभासाठी निघाले होते; परंतु ते पोहोचेपर्यंत विवाह सोहळे पार पडले होते. नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या दिवशी अर्धा दिवसाची रजा घ्यावी लागली. काही व्यावसायिकांची महत्त्वाची मीटिंग रद्द झाली, तर काहींच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या चर्चाच रद्द झाल्या. “उद्या आमची महत्त्वाची बैठक आहे, नोकरीचे काय होईल?” अशी चिंता अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रवाशांनी एकच प्रश्न उपस्थित केला जर ही गाडी रोज सकाळी पुण्यात पोहोचून परतीसाठी तयार होत असेल, तर पुन्हा तयारीसाठी एवढा वेळ का लागला? नेमकी चूक कुठे झाली? या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळाली नाहीत. शेवटी संताप गिळून प्रवाशांनी उशिरा गाडीत प्रवेश केला; पण मनात नाराजी आणि असहाय्यतेची भावना कायम राहिली. तीन ते साडेतीन तास उशिराने पुण्यात पोहोचल्याने अनेकांचे आर्थिक, मानसिक आणि वैयक्तिक नुकसान झाले. तरीही आश्चर्य म्हणजे एकाही प्रवाशाने अधिकृतपणे नुकसानभरपाईसाठी तक्रार दाखल केली नाही. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार देऊन ग्राहक मंचाकडे दाद मागणे आवश्यक आहे. रेल्वे सेवा ही केवळ प्रवासाची सुविधा नसून लोकांच्या भावना, जबाबदाऱ्या आणि आयुष्याशी जोडलेली असते. आता प्रश्न असा आहे. या नुकसानीसाठी जबाबदारी कोण घेणार? आणि प्रवासी स्वतःच्या हक्कासाठी पुढे येणार का? वेळच याचे उत्तर देईल. Kanthak Suryatal Post Views: 490 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस अंमलदाराच्या पुत्राची दहावी बोर्ड परीक्षेत ९२.४०% गुणांची चमक; राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक श्रध्दा दिपक बार्हाळीकर हिचे दहावी परिक्षेत यश, होलिसिटी पब्लिक स्कूलमध्ये पहिला क्रमांक मिळवत घेतले ९९ टक्के गुण