अहमदपूर (प्रतिनिधी)- अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत अहमदपूर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत १६ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटारसायकलींसह सुमारे ५ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा परिसरातील एका बारच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार २५ एप्रिल रोजी पोलिस उपमहानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अचानक छापा टाकला.
छाप्यात जुगार खेळताना १६ इसमांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.त्यांची नावे अशी आहेत ….
16. साहेब नबीसाब शेख वय 65 वर्ष राहणार टाकळगाव अहमदपूर.
आरोपींकडून १ लाख ४४ हजार ७५० रुपये रोख रक्कम, सुमारे १ लाख ३ हजार रुपये किमतीचे १४ मोबाईल फोन तसेच अंदाजे ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसळे, संजीव जिककालवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
दरम्यान, परिसरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या भागातील बेकायदेशीर व्यवसायांची माहिती ९१५०१००१०० या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्स अपद्वारे देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
