अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर शहर परिसरात उघड्यावर सुरू असलेल्या तीन पत्त्यांच्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई करून जुगार खेळणाऱ्या तीन जणांना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध जुगाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती अर्धापूर येथील उमर कॉलोनी भागातील सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला; मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले. छाप्यामध्ये जुगार खेळण्यासाठी वापरलेले पत्ते, रोख रक्कम तसेच घटनास्थळी उभ्या असलेल्या विविध १२ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. सोबतच १० हजर ३०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत ९ लक्ष ७० हजार रुपये आहे.हा सर्व मुद्देमाल पंचनामा करून अर्धापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या बाबतचा अहवाल डीआयजी पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे यांनी दिला आहे. पोलिसांनी पकडलेल्या किशन मधुकर लोणे (३५) रा.लोण ता. अर्धापूर, नागेश केशव राजेगोरे (२४) रा. शेलगाव ता. अर्धापूर, शंकर दादाराव कऱ्हाळे (२४) रा.राम नगर जुना कौठा नांदेड यांच्या सह पळून गेलेल्या १०-१२ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात वारंवार अशा प्रकारचे अवैध प्रकार होत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे Kanthak Suryatal Post Views: 956 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिथे मन जुळते तिथे वाद निवळते; चार दशकांचा तिढा अखेर शांततेच्या वाटेवर जमिनीच्या वादातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; काँग्रेस नगरसेविका प्रतिनिधीवर गुन्हा दाखल