नांदेड (प्रतिनिधी)- एप्रिल महिन्याचा अर्धा टप्पा पार झाला असून राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आता खरी सुगी सुरू झाली आहे. एप्रिलचे उरलेले पंधरा दिवस आणि मे महिन्याचा संपूर्ण कालावधी म्हणजे बदलीच्या राजकारणाचा अधिकृत हंगाम. 31 मेपर्यंत चालणाऱ्या या काळात कार्यालयीन फाईल्सपेक्षा भेटीगाठी, फोन कॉल्स आणि शिफारशींचीच जास्त लगबग दिसून येते. डिसेंबरपासूनच बदल्यांचे सत्र सुरू असते, पण एप्रिल-मे हा कालावधी विशेष मानला जातो. कारण याच काळात अनेकांना आपल्या मर्जीप्रमाणे नियुक्ती मिळवण्याची आशा असते. अधिकृत प्रक्रियेइतकीच अनधिकृत हालचालही या दिवसांत वाढलेली दिसते. काही जण नियमावली वाचतात, तर काही जण व्यवस्था समजून घेतात. घटनात्मक मूल्ये समान संधीची हमी देतात; मात्र प्रत्यक्ष व्यवहारात योग्य जागा मिळवण्यासाठी अनेकांचे गणित वेगळेच असते. काहीजण देवळात जाऊन श्री गणेशासमोर हजारो-लाखो मोदकांचा प्रसाद अर्पण करून इच्छित बदलीची प्रार्थना करतात. प्रश्न असा पडतो की, जर मोदकांच्या संख्येवरच कृपा अवलंबून असेल, तर ही भक्ती आहे की व्यवस्थेची नवी भाषा? देवाजवळही मागण्या विशेष पॅकेज मध्येच पोहोचतात का, असा उपरोधिक सवाल निर्माण होतो. या सुगीच्या काळात काही अधिकृत तर काही अनधिकृत एजंट सक्रिय झाल्याचेही दिसते. जगभर एजन्सी संस्कृतीला मान्यता मिळाल्याप्रमाणे येथेही बदली व्यवस्थेचे मार्गदर्शक पुढे येतात. योग्य व्यक्तीपर्यंत योग्य प्रस्ताव पोहोचवणे, फाईल योग्य दिशेने फिरवणे आणि इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळवून देणे ही त्यांची खासियत असल्याचे बोलले जाते. नाथ नगरीपासून मराठवाड्यापर्यंत या बदल्यांच्या महासागरात अनेकांचे भवितव्य तरंगताना दिसते. एखाद्याला मर्जीची जागा मिळावी यासाठी मोदकांची पेटी किती मोठी असावी, हा चर्चेचा विषय बनतो. लाखो मोदकांचा प्रसाद अर्पण करण्याइतकी तयारी असेल, तरच इच्छित फळ मिळते, अशी कुजबुज प्रशासनाच्या कॉरिडॉरमध्ये ऐकू येते. या पार्श्वभूमीवर हे वृत्त कोणावर आरोप करण्यासाठी नाही, तर जनजागृतीसाठी आहे. बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी, घटनात्मक मूल्यांना न्याय मिळावा आणि सुगीचा हा काळ व्यवस्थेच्या विश्वासार्हतेला धक्का न लावता पार पडावा एवढीच अपेक्षा. अन्यथा मोदक वाढत राहतील, एजंट बदलत राहतील आणि सामान्य कर्मचाऱ्यांच्या आशा मात्र दरवर्षीप्रमाणे फाईलमध्येच अडकून राहतील. काही हेरंबाना मोदक आवडत नाहीत अश्या परिस्थितीत त्यांची अकार्यकारी पदावर आपोआपच बदली होते. मात्र वक्रतुंडा अश्याना तुझ्या झायेची नक्कीच गरज असते. कारण त्यांचेच हात तर गरिबांचे अश्रू पुसण्याचे कार्य करत राहतात.तेव्हा लंबोदरा त्यांच्यावरचा तुझा हात कडून घेऊ नकोस. तुझे भक्त खूप उपकार मानतील. Kanthak Suryatal Post Views: 636 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी;राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन नांदेड जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास