वाळू , समिती आणि गुप्त भेटींचा महान प्रयोग
नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील रेतीप्रेमी प्रशासन आणि जागरूकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या विधिमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्ह्यातील तीन दिवसीय दौरा नुकताच मोठ्या गाजावाजात आणि थोड्याशा गुप्ततेत पार पडला. पारदर्शकतेचा आदर्श ठेवत समितीने पत्रकार, छायाचित्रकार, कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठकीपासून दूर ठेवण्याचा अभिनव निर्णय घेतला. कारण जास्त पारदर्शकता आरोग्यास अपायकारक असू शकते, असे सूत्रांचे मत आहे.
बिलोली परिसरातील जवळपास 30 रेती घाटांचा आढावा घेताना समिती सदस्यांनी पाण्यापेक्षा वाळू जास्त वाहते हा वैज्ञानिक शोध लावल्याचे समजते. परवानगी फक्त 11,000 ब्रास वाळू उपशाची असताना घाटावर दिसलेली अतिरिक्त वाळू ही निसर्गाची उदारता की मानवी कष्टाचे फळ याचा अभ्यास अद्याप सुरू आहे.
दरम्यान, काही माध्यमांनी तहसीलदार गजानन शिंदे आणि उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या निलंबनाच्या सूचना समितीने दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. मात्र कायद्याच्या पुस्तकाने शांतपणे सांगितले की, विधिमंडळ अंदाज समितीला थेट निलंबनाचे अधिकारच नसतात. त्यामुळे आदेशापेक्षा बातम्यांचा वेग जास्त असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.पण समिती आली तेव्हा एकही हायवा आणि एकही पोकलँड त्या समितीला दिसले नाही कारण समितीच्या आगमनापूर्वीच त्यांना हाकलून देण्यात आले होते. तो कोण याचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे
समितीमध्ये एकूण 29 सदस्य असताना दौऱ्यावर फक्त 9 जण उपस्थित होते. उर्वरित सदस्यांनी बहुधा दूरस्थ निरीक्षण (महाभारतातील संजय सारखे) ही आधुनिक पद्धत स्वीकारली असावी. इतकंच नव्हे तर घाटावर समितीला नेणारा गुप्त रहस्यमय मार्गदर्शक कोण, हा प्रश्न स्थानिक चर्चेचा विषय ठरला आहे.खरे तर पत्रकारांनी यावर आपले शब्द बाण चालवायला हवे होते पण आमच्या सह कोणीच हि हिम्मत दाखवली नाही. याचा शोध जनतेने घेतला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे.
यापूर्वी 21 मार्च रोजी डीआयजीच्या विशेष तपास पथकाने 36 हायवा गाड्या आणि 6 पोकलँड मशीन पकडले होते. पण तेव्हा तहसीलदार गजानन शिंदे यांच्या आदेशाने त्या सर्व गाड्या विना कार्यवाहीच्या कागदोपत्री मालक वेगळे, प्रत्यक्ष संचालन मात्र मनदीप सिंग नावाच्या व्यक्तीकडे असल्याचेही सांगितले गेले होते. काही तीन अक्षरी आडनावाचे पोलीस या रेतीप्रेमी व्यवस्थेत रस घेत असल्याच्या कुजबुजाही सुरू आहेत. नाथनगरीतून हा वाळूचा कारभार चालवला जातो हे मात्र नक्की. अश्या पद्धतीने डीआयजी पथकाने केलेली कारवाई मात्र वाळूसारखीच हातातून निसटल्याचे दिसले.कारण या वाळू मध्ये आता खात्रीलायक सूत्रांच्या मते, पाच अक्षरी आडनावाच्या व्यक्तीने सुद्धा हातभार लावला आहे.या व्यक्तीच्या संदर्भाने सुद्धा शब्द गुंड का गप्प बसलेले आहेत हा प्रश्न मोठा आहे.
या सर्व प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा उरतो समिती आली, घाट पाहिले, अतिरिक्त वाळूही दिसली… तरीही सर्व काही शांत कसे? उत्तर कदाचित शॅडोप्ले या नव्या प्रशासकीय कलाप्रकारात दडलेले असावे, जिथे सर्वजण नियमांचे पालन करत असल्याचे दाखवतात आणि वाळू मात्र स्वतःच ट्रकमध्ये भरून निघून जाते. स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे की हा खेळ केवळ नांदेडपुरता मर्यादित नाही; महाराष्ट्रात रेती ही फक्त नैसर्गिक संसाधन नसून सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक बनली आहे. समाजात आदराने नमस्कार मिळवणारे अनेक मान्यवर दिवसाढवळ्या पर्यावरणप्रेमी आणि रात्री रेतीप्रेमी बनतात, अशीही चर्चा आहे.
असो… चौकशी, नोटिसा, जाब-जबाब आणि अहवाल यांचा पुढचा अंक लवकरच रंगणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्रात नदी वाहत राहील, वाळू निघत राहील आणि समित्या पाहणी करत राहतील पारदर्शकतेच्या नावाखाली पूर्ण गोपनीयतेत. थोडक्यात सांगायचे तर, वाळूचा हा खेळ फक्त नांदेडपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात असाच आदराने नमस्कार मिळवत सुरू आहे. काही लोक समाजात मान मिळवतात, पण पडद्यामागे काय चालते हे कोणालाच कळत नाही, हेच तर या लोकशाहीतलं सर्वात मोठं गुपित आणि आनंदाची बातमी आहे!.
