बाप-लेकाच्या निर्घृण हत्येने पोलीस दलाची अब्रू वेशीवर; कायद्याचे रक्षकच बनले भक्षक, नऊ नराधमांना न्यायालयानं दिली नरकाची वाट!
हे पोलीस नाहीत, तर सरकारी पगारावर पोसलेले कसाई आहेत, अशा शब्दांत सर्वसामान्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे
मदुराई ( लोकअपेक्षा विशेष प्रतिनिधी)- रक्षण करण्याची शपथ घेणारे हात जेव्हा रक्ताने माखतात, तेव्हा कायद्याचा विळखा किती घट्ट असू शकतो, याचा प्रत्यय आज संपूर्ण देशाला आला आहे. तामिळनाडूतील बहुचर्चित साथनकुलम लॉकडाऊन हत्याकांडाचा निकाल लागला असून, मदुराई न्यायालयाने मानवतेला काळिमा फासणाऱ्या नऊ पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावली आहे. वर्दीच्या माज्यात एका सामान्य दुकानदाराचा आणि त्याच्या निष्पाप मुलाचा जीव घेणाऱ्या या नराधमांना आता थेट मृत्यूच्या फासावर लटकवले जाणार आहे.
कायद्याचा अमानुष चेहरा: नेमकं काय घडलं होतं?
२०२० मध्ये संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीत असताना, मदुराईत पोलिसांच्या क्रूरतेचा नंगानाच सुरू होता. पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स या दोन सामान्य नागरिकांचा गुन्हा काय? तर फक्त काही मिनिटे जास्त वेळ दुकान उघडे ठेवणे. या क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी त्यांना उचलले आणि पोलीस कोठडीत नेऊन रात्रभर जो अमानुष छळ केला, तो ऐकून आजही अंगावर काटा येतो.
पोलीस कोठडीत त्यांना काठ्यांनी इतके मारले की रक्ताच्या थारोळ्यात ते निपचित पडले होते. टेबल आणि भिंती रक्ताने माखल्या होत्या. ज्या पोलिसांनी जनतेचे रक्षण करायचे, तेच शिकारी बनले होते.
पुरावे नष्ट करण्याचा नीच प्रयत्न
या नराधम पोलिसांनी केवळ हत्याच केली नाही, तर आपला गुन्हा लपवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले आणि हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवले. मात्र, एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष आणि सीबीआयच्या सखोल तपासाने या नऊ गुंडांचा बुरखा फाडला. खुद्द पोलीस यंत्रणेनेच सत्य लपवण्याचा प्रयत्न करणे, हे लोकशाहीसाठी लज्जास्पद होते.
न्यायालयाचा हथोडा आणि पोलिसांना धडा!
६ एप्रिल २०२६ हा दिवस भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल. मदुराई न्यायालयाने स्पष्ट केले की, वर्दीत आहात म्हणजे तुम्हाला कोणाचाही जीव घेण्याचा परवाना मिळालेला नाही. शिक्षा
निरीक्षक एस. श्रीधर
उपनिरीक्षक पी. रघु गणेश आणि के. बालकृष्णन
हेड कॉन्स्टेबल एस. मुरुगन, ए. समिदुराई
कॉन्स्टेबल एम. मुथुराज, एस. चेल्लादुराई, एक्स. थॉमस फ्रान्सिस आणि एस. वेलुमुथू. पोलीस की कसाई?
हे पोलीस नाहीत, तर सरकारी पगारावर पोसलेले कसाई आहेत, अशा शब्दांत सर्वसामान्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. एखाद्या सामान्य माणसाला बेदम मारहाण करून त्याचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा अधिकार या ‘वर्दीतील गुंडांना’ दिला कोणी? हा निकाल म्हणजे अशा प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यासाठी धोक्याची घंटा आहे, जो आपल्या पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्यांवर अन्याय करतो.
न्यायालयाने या ९ पोलिसांना फाशी देऊन पीडित कुटुंबाला केवळ न्यायच दिला नाही, तर पोलीस दलातील अशा काळी माती फासणाऱ्या प्रवृत्तींना कायमची चपराक लगावली आहे. आता पोलीस कोठडीत कोणावरही हात उचलण्यापूर्वी प्रत्येक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिसाच्या डोळ्यासमोर ‘फाशीचा दोर’ नक्कीच येईल! न्याय उशिरा मिळाला असला तरी तो कडक मिळाला आहे; वर्दीची दहशत नाही, तर कायद्याचा वचक असायला हवा!
