परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड; देखभाल कर्मचाऱ्यावर हल्ला

नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वर दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी रेल्वे मालमत्तेची तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक तोडून लिफ्टमध्ये बसवलेला सीसीटीव्ही कॅमेरा तोडफोड करत असल्याचे आढळून आले. ही बाब ड्युटीवर असलेल्या इलेक्ट्रिकल मेंटेनन्स (AMC) कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला.

मात्र संबंधित व्यक्ती आक्रमक झाली व तिने कर्मचाऱ्याशी शिवीगाळ करत शारीरिक मारहाण केली. या परिस्थितीतही कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीचा फोटो काढण्यात यश मिळवले व इतर इलेक्ट्रिकल कर्मचारी तसेच रेल्वे संरक्षण दल (RPF) यांना तात्काळ माहिती दिली. दरम्यान, अतिरिक्त कर्मचारी व RPF घटनास्थळी पोहोचेपर्यंत ती व्यक्ती तेथून पळून गेली होती. घटनास्थळी तपासणी केल्यानंतर लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक तसेच सीसीटीव्ही कॅमेरा नुकसान झालेल्या अवस्थेत आढळून आले.

या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवून त्याला पकडण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रेल्वे मालमत्तेचे नुकसान व कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच स्थानक परिसरातील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व देखरेख अधिक बळकट करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नुकसान झालेल्या लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेरा तात्काळ दुरुस्त किंवा बदलण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधा व आरामासाठी रेल्वे स्थानकांवर विविध प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यामध्ये सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशा प्रकारच्या तोडफोडीच्या घटना रेल्वेच्या प्रवासी सुविधा सुधारण्याच्या प्रयत्नांना बाधा आणणाऱ्या ठरतात.

रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रवासी सुविधांचा काळजीपूर्वक व जबाबदारीने वापर करावा. रेल्वे मालमत्तेचे नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करू नये. तसेच कोणीही प्रवासी सुविधा किंवा इतर रेल्वे मालमत्तेची तोडफोड करताना आढळल्यास त्वरित रेल्वे प्रशासन किंवा रेल्वे संरक्षण दलाला माहिती द्यावी.प्रवासी, कर्मचारी आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असून रेल्वे पायाभूत सुविधांचे संरक्षण व जतन करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!