लातूर जिल्ह्यातशहाजी उमाप पथकाचा छापा; १३.२४ लाखांचा गुटखा व वाहन जप्त

वाढवणा-  नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे १ एप्रिल रोजी वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील डावूळ गावाजवळ छापा टाकला. अहमदपूरकडे जाणाऱ्या मारुती एर्टिगा वाहनाची तपासणी केली असता विक्रीसाठी नेण्यात येत असलेला ६ लाख २४ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. यावेळी गुटख्यासह वाहन असा एकूण १३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी फय्युम अब्दुल रऊफ शेख (वय ४३), निसार गफ्फार बिस्ती (वय २६) व मौजन आजम सय्यद (रा. अहमदपूर) यांच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवण, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधित गुन्ह्यांमध्ये कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,गणेश धुमाळ,संजीव जिंकलवाड,कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले.

दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन (९१ ५० १०० १००) सुरू केली असून नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!