जेव्हा पोलीस बनतो आधारवड ; संवेदनशीलतेची हृदयस्पर्शी कहाणी

नांदेड (प्रतिनिधी)- आमचे नेते चैतन्य बापू देशमुख यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक साधीशी पोस्ट मनाला खोलवर स्पर्श करून गेली. त्याची दखल घेणे आम्हाला जबाबदारी वाटली. म्हणतात ना, जिथे करुणा असते तिथे देव स्वतः वास करतो, त्याचा प्रत्यय या घटनेत आला. प्रवासादरम्यान हदगावजवळील हेरिटेज शिव भोजनालयात चैतन्य बापू देशमुख थांबले होते. साधेसे भोजनालय, साधी माणसे; पण त्या ठिकाणी उलगडलेली माणुसकी मात्र असामान्य होती.

भोजनालय चालवणाऱ्या मालकाने सांगीतलेली एक  परिस्थिती ऐकून मन हेलावून गेले. दोन लहान मुले, वडिलांचे छत्र हरपलेले,आईची मानसिक अवस्था ठीक नाही, आणि घरची जबाबदारी लहान खांद्यांवर. लहान वयात मोठी जबाबदारी ही म्हण अक्षरशः त्यांच्या आयुष्यात उतरली होती. ही मुले कामही करतात आणि जवळच्या गुरुकुलात शिक्षणही घेतात. संकटांच्या वादळातही शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून अडचणीतच माणसाची खरी ओळख होते हे पुन्हा सिद्ध झाले.

या घटनेची पुढील कडी आणखी प्रेरणादायी आहे. चैतन्य बापूंनी हदगावचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांना ही गोष्ट सांगितली. अनेकदा आपण दुःख ऐकतो, सहानुभूती व्यक्त करतो आणि पुढे निघून जातो. पण म्हणतात ना, बोलाची कढी आणि बोलाचा भात पोट भरत नाही खरी किंमत कृतीची असते. संकेत दिघे यांनी हाच आदर्श दाखवला.

फक्त संवेदना व्यक्त करून न थांबता त्यांनी त्या दोन्ही मुलांसाठी नवीन कपडे, बूट घेतले आणि स्वतः जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी मुलांना ते कपडे घालून दिले, त्यांच्याशी संवाद साधला आणि शिक्षणाचे महत्त्व समजावले. त्यांनी सांगितले,मोठे व्हा, शिक्षण घ्या आणि उद्या कुणाला गरज भासली तर त्याच्या मदतीला धावून जा. ही केवळ भेट नव्हती; ती जीवनाला दिशा देणारी प्रेरणा होती. जशी करणी तशी भरणी या म्हणीप्रमाणे आज दिलेली माणुसकी उद्या समाजात अनेक चांगल्या कृतींचे बीज रोवणार आहे.खरे तर आम्ही त्या मुलांना प्रत्यक्ष भेटलो नाही; पण चैतन्य बापू देशमुख यांच्या माध्यमातून संकेत दिघे यांनी दाखवलेली माणुसकी अनुभवायला मिळाली. एक दिवा दुसऱ्या दिव्याला लावला की अंधार कमी होतो  ही घटना त्याच प्रकाशाची साक्ष देणारी आहे. समाजात अजूनही संवेदनशील हृदये जिवंत आहेत, याचा विश्वास या प्रसंगाने अधिक दृढ केला.

आजच्या धावपळीच्या जगात अनेकदा माणूसपण हरवत चालल्याची खंत व्यक्त केली जाते. मात्र अशा कृती पाहिल्या की वाटते, सत्कर्माची सावली कधीच वाया जात नाही.चैतन्य बापू देशमुख यांची संवेदनशील दृष्टी आणि संकेत दिघे यांची कृतीशील माणुसकी ही समाजासाठी प्रेरणेची दीपशिखा आहे.खरोखरच, शाबासकी द्यावी अशी ही कृती! कारण माणुसकी हीच खरी श्रीमंती असते. या दोन्ही व्यक्तींनी दाखवून दिले की पद मोठे असणे महत्त्वाचे नाही, तर मन मोठे असणे महत्त्वाचे आहे. समाजात अशी माणसे आहेत म्हणूनच आशेचा दिवा आजही तेजाने पेटलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!