सगरोळी बस स्थानकात अवैध वाळू वाहतूक प्रकरण उघड; १.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

सगरोळी (प्रतिनिधी) – मांजरा नदीतून अवैधरित्या बारीक वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या चार गाड्यांवर पोलिसांनी कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त साहित्याची एकूण किंमत १ कोटी २१ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सगरोळी पोलीस चौकी येथीलपोलीस अंमलदार चंदर विठ्ठल आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता पोलीस पथकाने सगरोळी बस स्थानक परिसरात छापा टाकला. या पथकात पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाची गवळी यांचा समावेश होता. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई करत मांजरा नदीतून वाळू भरून आलेल्या चार वाहनांना ताब्यात घेतले.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एमएच २० जीटी ९०११, एमएच ५५ सी ९१००, टीएस १५ यूइ २२७९ आणि एमएच २६ बीई ५७९९ या क्रमांकांच्या गाड्यांचा समावेश आहे. या वाहनांच्या चालकांकडे वाळू वाहतुकीसंबंधी आवश्यक कागदपत्रे नसल्याचे आढळून आले.

या प्रकरणी सुनील अर्जुन वाघमारे (रा. भेंडेगाव, ता. मुखेड),ब्रिज किशोर राधा शर्मा (रा. भवानी चौक, देगलूर), सय्यद साब बुऱ्हानसाब बाबन  (रा. टीचर कॉलनी, औराद, कर्नाटक) आणि संजय गोविंद बनसोडे (रा. भोपळा, ता. नायगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती मुद्देमवार हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!