आज इराण–अमेरिका–इस्रायल युद्धाचा 23वा दिवस उजाडला आहे. या 23 दिवसांत जगाने केवळ बॉम्बस्फोट, क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण किंवा राजकीय विधानं पाहिली नाहीत. तर सत्तेच्या अहंकाराची आणि अस्तित्वासाठी झगडणाऱ्या राष्ट्राच्या जिद्दीची जिवंत लढाई अनुभवली आहे. या संघर्षाची तुलना जर भारतातील 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याशी केली, तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण एकीकडे इराण स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी मृत्यूच्या दारात उभा राहून झुंज देत आहे, तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायल आपले जागतिक वर्चस्व टिकवण्यासाठी हा संघर्ष पुढे ढकलत आहेत.
हा फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या राष्ट्रासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा असतो, ते कोणत्याही परिस्थितीत लढतं ते हार मानत नाही. पण ज्यांना केवळ ताकद दाखवायची आहे, ते दूरून गर्जना करतात, परंतु प्रत्यक्ष रणांगणात त्यांची गोची होऊ लागते. आज नेमकं हेच दृश्य जगासमोर उभं आहे.
या युद्धादरम्यान एक महत्त्वाची घडामोड म्हणजे शस्त्रसाठ्याची प्रचंड वाढ. विविध राष्ट्रांनी मिळून तब्बल 1 लाख 32 हजार 800 कोटी रुपयांचे शस्त्र खरेदीचे करार केले आहेत. यावरून स्पष्ट होतं की जग युद्धाच्या दिशेने झुकत आहे. अमेरिका आपल्या अत्याधुनिक एफ-35 आणि एफ-16 या लढाऊ विमानांवर गर्व करत होती ही विमाने रडारला न दिसणारी, आवाज न करणारी, आणि अजेय मानली जात होती. पण इराणने हीच विमाने पाडल्याचा दावा करत अमेरिकेच्या प्रतिष्ठेला थेट धक्का दिला आहे. अमेरिकेने यापूर्वीही जून 2025 मध्ये अशाच प्रकारे हल्ला करून विजयाचा दावा केला होता, पण प्रत्यक्षात त्या हल्ल्याचे परिणाम फारसे प्रभावी ठरले नव्हते. अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला करूनही कोणतीही गळती (लीकेज) झाली नसल्याचे अहवाल सांगतात, ज्यामुळे अमेरिकेचे दावे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

युद्धाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आर्थिक खेळ. अमेरिकेने इराणवरील काही निर्बंध शिथिल करून त्यांना तेल विक्रीची मुभा देण्याचा प्रयत्न केला. उद्देश स्पष्ट होता. जागतिक बाजारातील तेलटंचाई कमी करणे आणि किंमती नियंत्रणात ठेवणे. पण इराणने ठामपणे नकार दिला. “एक थेंब तेलही विकणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी अमेरिकेला थेट आव्हान दिलं. दरम्यान, इराणने 4000 किमी अंतरावर क्षेपणास्त्र प्रक्षेपित करून सायप्रसजवळील अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्य तळांना इशारा दिला. हा केवळ हल्ला नव्हता तर एक स्पष्ट संदेश होता: “तुम्ही युद्धात उतरलात, तर आम्हीही मागे हटणार नाही. यामुळे युरोपातील राष्ट्रांची झोप उडाली आहे. कारण या संघर्षाचा परीघ वाढत चालला आहे, आणि त्यात भारतासह अनेक देश अप्रत्यक्षपणे ओढले जाऊ शकतात.
हार्मुजच्या सामुद्रधुनीवर इराणने नियंत्रण ठेवत अनेक तेलवाहू जहाजे अडवली आहेत. अमेरिकेला ती मार्गिका खुली करण्यात अपयश आले आहे. नौदल मागे हटले, हवाई दलाने आपली विमाने सुरक्षित अंतरावर हलवली ही परिस्थिती अमेरिकेच्या तथाकथित ताकदीवर प्रश्नचिन्ह उभी करते. याच पार्श्वभूमीवर, यमनमधील हूथी बंडखोरांनी लाल समुद्रात अडथळे निर्माण केल्यास जागतिक व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. यामुळे जग आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभं राहू शकतं.
चीन आणि रशियाची भूमिकाही या संघर्षात अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. अधिकृतरित्या ते तटस्थ असल्याचं सांगितलं जात असलं, तरी गुप्त माहितीच्या आधारे इराणला मदत केली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाने इराणला धोका देणार नाही, हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ तीन देशांपुरता मर्यादित न राहता, तो महायुद्धाच्या दिशेने झुकत असल्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, अमेरिकेतील आगामी निवडणुका, इस्रायलवरील अंतर्गत दबाव, आणि जागतिक स्तरावर वाढत चाललेला विरोध या सर्वांचा परिणाम युद्धाच्या रणनीतीवर होत आहे. सुरुवातीला अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देणारे अनेक देश आता तटस्थ किंवा विरोधी भूमिका घेत आहेत. जगातील जनमत हळूहळू इराणच्या बाजूने झुकताना दिसत आहे.
निष्कर्ष: दोन युद्धं, एकच सत्य
एकीकडे जागतिक स्तरावर अस्तित्वासाठी लढणारा इराण आणि वर्चस्वासाठी झगडणारी अमेरिका-इस्रायल यांची लढाई आहे. सत्तेचा गैरवापर आणि सत्य दडपण्याचा प्रयत्न. आज गरज आहे ती स्पष्ट भूमिकेची. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची. कारण मग तो अन्याय जागतिक असो किंवा स्थानिक त्याचा परिणाम शेवटी सामान्य माणसावरच होतो. ही लढाई केवळ इराणची नाही, ही लढाई प्रत्येक त्या माणसाची आहे जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो. आणि हा संघर्ष संपेपर्यंत—सत्याचा आवाज दाबला जाणार नाही.
