मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन राहिलेला हा खरात भारतात परतल्यानंतर अध्यात्म, मंत्र-तंत्रच्या नावाखाली सरळ फसवणुकीचा बाजार मांडत होता. अंधभक्तांची रांग लागली आणि त्याच्या दरबारात राजकीय नेत्यांचीही वर्दळ वाढली हीच या प्रकरणातील सर्वात घाणेरडी बाजू ठरत आहे.
एका पीडित महिलेने 2022 ते 2025 या तीन वर्षांत सातत्याने लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. केवळ शोषणच नाही, तर त्याचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंगचा उद्योग सुरू होता. तक्रार दाखल झाल्यानंतरही कारवाई रोखण्यासाठी पडद्यामागे मोठे प्रयत्न झाले पण अखेर पोलिसांनी कारवाई केलीच.

नाशिक पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने चोर आला चोर आला असे सांगत अशोक खरातच्या फार्महाऊसमध्ये प्रवेश करून खरातला अटक केली. माझ्यावर हात टाकलात तर पाप लागेल, अशा धमक्या देणाऱ्या या ढोंगी बाबाला पोलिसांनी ठणकावून उत्तर दिलं कायद्यापुढे कोणतंही पाप-पुण्य चालत नाही.
फार्महाऊसच्या तपासात रिव्हॉल्वर, गोळ्या,तलवारीसारखी शस्त्रं आणि शेकडो व्हिडिओ सापडले. काही व्हिडिओ आणि फोटो लीक झाले असून त्यात अनेक नेते या बाबाच्या पाया पडताना दिसत आहेत हे चित्रच समाजासाठी लाजिरवाणं आहे.
या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत रूपाली चाकणकर यांच्यावरही बोट ठेवलं आहे. तंत्र-मंत्र शिकणे, अघोरी कृत्यांमध्ये सहभाग अशा आरोपांनी या प्रकरणाला आणखी काळी किनार दिली आहे.
अजून धक्कादायक म्हणजे, अल्पवयीन मुलांवरही कथित तंत्र करतानाचे व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे. महिलांना तू राधा, मी कृष्ण असं सांगून त्यांचं मानसिक आणि शारीरिक शोषण केलं जात होतं ही विकृती अंगावर काटा आणणारी आहे.


दरम्यान, या प्रकरणात नीरज जाधव याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडूनच अनेक व्हिडिओ लीक झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांचा तपास नेमका सत्य उघड करण्यासाठी आहे की कोणाला वाचवण्यासाठी हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आरोप करत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर संजय राऊत यांनी दावा केला की राज्यातील नऊ मंत्र्यांचे या बाबासोबत संबंध आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय जनतेचा विश्वास बसणार नाही.
देशाचे गृह मंत्री अमित शाह,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,सुनील तटकरे आणि इतर नेत्यांसोबतचे फोटोही समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वादळाचं स्वरूप आलं आहे.

सगळ्यात मोठा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे अशोक खरात बोलला तर किती जणांचे मुखवटे फाटतील? आणि तो बोलण्याआधीच बदलापूर पॅटर्न सारखं काही घडेल का? जनतेच्या मनात ही भीती ठाण मांडून बसली आहे.


