मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही शहरातील वाहतूक कोंडी कमी होताना दिसत नाही. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस तसेच इतर जड वाहनधारकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे वास्तव नजरेस पडत आहे. स्थानिक प्रशासनाने शहरातील वाहतूक सुरळीत राहावी या उद्देशाने जड वाहनांच्या शहरातील प्रवेशावर काही प्रमाणात निर्बंध घातलेले असतानाही अनेक जड वाहने शहरातील मुख्य मार्गांवरून सर्रासपणे ये-जा करताना दिसतात.
विशेषतः जुन्या मोढा परिसर, श्री गुरु गोबिंद सिंघ जी रोड, महावीर चौक तसेच शहीद भगतसिंग जी रोड या महत्त्वाच्या मार्गांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि इतर जड वाहने नियमितपणे प्रवेश करत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. आधीच अरुंद रस्ते, त्यात सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि त्याच मार्गांवरून सुरू असलेली दुहेरी वाहतूक यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. या सर्व परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिक, व्यापारी तसेच शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी यांना सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर अशा गर्दीच्या आणि गोंधळाच्या परिस्थितीत अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
म्हणूनच पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि जड वाहनधारकांच्या शहरातील अनियमित प्रवेशावर वेळीच आणि कडक नियंत्रण आणले, तर नांदेड शहरातील वाहतुकीच्या समस्येत काही प्रमाणात निश्चितच सुधारणा होऊ शकते. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे ही काळाची गरज आहे.
– राजेंद्र सिंघ शाहू
इलेक्ट्रिकल ट्रैनंर नांदेड
7700063999
