अवैध वाळू साठ्यावर मोठी कारवाई – २ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
नांदेड –अहमदपूर परिसरात अवैध वाळू साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
शहाजी उमाप (पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.४५ वाजता अहमदपूर-नांदेड रोडलगत शेत परिसरात छापा टाकला.
छाप्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या साठवून ठेवलेली वाळू आढळून आली. प्राथमिक तपासात ही वाळू नांदेड परिसरातून आणून विक्रीसाठी साठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जप्त मुद्देमालाचा तपशील:
६ टाटा हायवा ट्रक
१ जेसीबी मशीन
सुमारे २२० ब्रास वाळू
एकूण किंमत : २ कोटी २१ लाख रुपये
या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सलग कारवायांचा धडाका
दरम्यान, मागील दोन दिवसांत नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी जिल्ह्यांतही अवैध मटका व जुगार व्यवसायांवर पोलिसांनी कारवाया केल्या.
पाच स्वतंत्र छाप्यांमध्ये २ कोटी ४२ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांचे आवाहन
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी पथकाचे कौतुक केले.
अवैध व्यवसायांबाबत माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा ९१ ५० १०० १०० या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच अधिकृत संकेतस्थळावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
