नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी शहर विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, उपमहापौर दीपकसिंह, रावत, गटनेते महेश कनकदंडे, आयुक्त महेशकुमार डोईफोडे, भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना महापौर सौ. मुळे म्हणाल्या की, नांदेड शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी १०० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करण्यात आला असून शहरातील मूलभूत नागरी सुविधा मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी शहर स्वच्छता, वाहतूक व्यवस्था सुधारणा, गोदावरी नदी प्रदूषणमुक्ती, स्मशानभूमी सुविधा, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, महिलांसाठी स्वच्छतागृहे, शाळांमधील भौतिक सुविधा, वृक्षारोपण आणि आरोग्य सुविधा वाढविणे यासारखी कामे १०० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी कृती आराखड्याचे सादरीकरण करताना सांगितले की, शहरात १०० टक्के घरगुती कचरा विलगीकरण, डोअर-टू-डोअर संकलन, नाल्यांची पूर्वमोसमी साफसफाई आणि ‘डीप क्लिनिंग’ मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच शहरातील मलनिस्सारणाचे पाणी थेट गोदावरी नदीत जाणे थांबवून नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रलंबित प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत.
पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नियोजनबद्ध जलपुरवठा, पंपिंग स्टेशनसाठी भूमिगत वीज केबल, तसेच काही भागात २४x७ पाणीपुरवठ्याचा प्रायोगिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकांवर एआय-आधारित ट्रॅफिक सिग्नल बसविणे, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारणे आणि धोकादायक वीजवाहिन्या भूमिगत करण्याचीही योजना आहे.
महिलांसाठी आठवडी बाजार परिसरात स्वच्छतागृहे उभारणे, महापुरुषांच्या पुतळ्यांना सीसीटीव्ही संरक्षण, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, अतिक्रमणमुक्त चौक आणि नागरिकांना ७४ शासकीय सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.
आरोग्य विभागामार्फत ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोग तपासणी मोफत करण्यात येणार असून शिवाजीनगर येथील कस्तूरबा मातृत्व सेवा केंद्रात विशेष तपासणी कक्ष सुरू केला जाणार आहे. शहर विकासासाठी सर्व पदाधिकारी, प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून विकसित नांदेड चा संकल्प निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला
