नगरसेवकांनी केली नालेसफाईची पाहणी; डॉ. आंबेडकरनगरच्या वर्षानुवर्षांच्या अडचणीवर तोडगा निघणार का?

 

नांदेड : -शहरातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाल्याच्या अडचणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, घाणीचा तीव्र वास, डासांचे वाढते प्रमाण आणि आरोग्याचा धोका या सर्व समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक इंजि.प्रशांत इंगोले, नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे , चंद्रमणी सावंत यांनी परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने साफसफाईचे निर्देश दिले. नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून काही ठिकाणी अतिक्रमण व कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे ठप्प झाल्याचे निदर्शनास आले.

नगरसेवकांनी संबंधित विभागाला लवकरात लवकर यंत्रसामग्री लावून संपूर्ण नालेसफाई मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. तसेच केवळ तात्पुरती साफसफाई न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.

दरम्यान, दरवर्षी पाहणी होते, आश्वासने मिळतात; पण प्रश्न तसाच राहतो, अशी खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. आता या पाहणीनंतर खरोखरच डॉ. आंबेडकरनगरच्या नाल्याची वर्षानुवर्षांची अडचण सुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!