शिवजन्मोत्सवानिमित्त २२ रोजी जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन

संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रामकृष्ण बदने, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर यांची उपस्थिती; परिसंवाद, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलनासह भरगच्च कार्यक्रम

नांदेड- येथील सप्तरंगी साहित्य मंडळ आणि मूकनायक वाचनालय मांजरम यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नायगाव तालुक्यातील मांजरम येथे ६ व्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक शिवाजी बच्चेवार यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, ज्येष्ठ रिपाइं नेते मधुकर मांजरमकर, प्राचार्य बाबासाहेब शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. विजय गोणारकर, प्राचार्य लक्ष्मण कोंडावार, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे,  पोलीस उप अधिक्षक शाम पानेगांवकर आदींची उपस्थिती राहणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे आणि चित्र व नाणी प्रदर्शनही होणार आहे. उद्घाटन सत्रात विविध पुरस्कार वितरण, डी. के. मांजरमकर गौरव ग्रंथाचे प्रकाशन व त्यानंतर परिसंवाद, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलन, ठराव वाचन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम विविध सत्रांतून होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सचिन कांबळे, निमंत्रक शिवाजी कोनकेवाड, मुख्य संयोजक जीवन मांजरमकर यांनी दिली.

          उद्घाटन सत्रानंतर डॉ. माधव गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात माझी भूमिका या विषयावर परिसंवाद होणार असून यात डॉ. सुरेश वाघमारे, डॉ हनमंत भोपाळे हे विचारवंत सहभागी होणार आहेत. कथाकथन सत्रात सुप्रसिद्ध कथाकार बालाजी थोटवे, राम तरटे, बालाजी पेटेकर आपल्या कथा सादर करणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद स्वाती कान्हेगांवकर भूषविणार आहेत. गझलसंध्या सत्रात शंकर माने, चंद्रकांत कदम, आत्तम गेंदे, सतीश देशमुख, रोहिणी पांडे, स्वाती भद्रे आदी गझलकार सहभागी होणार आहेत. पाचव्या सत्रात ज्येष्ठ कवी प्रा. प्रल्हाद हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली पन्नास कवी कवयित्रींचे कविसंमेलन काव्यपौर्णिमा – १०४ हा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर समारोप सत्रात ठराव वाचन संमेलनाध्यक्ष व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. दरम्यान, लावणी सम्राज्ञी डॉ. विद्याश्री येमचे यांच्या लावणीचा बहारदार कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मूकनायक वाचनालय व सप्तरंगी साहित्य मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत असून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संमेलनस्थळाला साहित्य रसिकाचे नांव

        अनेक छोट्या मोठ्या साहित्य संमेलनाच्या स्थळाला, विचारमंचाला तसेच प्रवेशद्वाराला महापुरुष किंवा सुप्रसिद्ध साहित्यिकांची नावे दिली जातात. परंतु या संमेलनास सामाजिक कार्यकर्ते, साहित्य रसिक व वाचकांची नावे दिली आहेत. नायगाव तालुक्यातील मांजरम येथे संपन्न होत असलेल्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपास कै. भाई दिगंबरराव पा. शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. जिपहा मांजरम येथे संमेलनाचे स्थळ असून या परिसराला कै. माधवराव शिंदे गुरुजी साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे तर काव्यमंचास कालवश प्रा. अनंत मांजरमकर यांचे तर प्रवेशद्वाराला स्मृतिशेष रुक्मिणबाई जळबाजी गोणारकर यांचे नाव देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!