नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता टाकलेल्या छाप्यात एकूण 10 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आणि 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस अंमलदार विठ्ठल शिंदे, शेख आसिफ, शेख जमीर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पथक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता मार्कंड गावात पोहोचले आणि तेथून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात छापा टाकला.
या कारवाईत पाच ब्रास वाळू (अंदाजे 25 हजार रुपये किमतीची), एक इंजिन (3 लाख रुपये) आणि पंधरा तराफे (7 लाख 50 हजार रुपये) असा एकूण 10 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छाप्यावेळी काही जण घटनास्थळावरून पळून गेले.
या प्रकरणी बालाजी केशवराव लामधाडे, बाबुराव क्षीरसागर, मदन येवले (सर्व रा. मार्कंड) यांच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा क्रमांक 143/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करून सर्व तराफे व इंजिन जागीच जाळून नष्ट केले. तसेच जप्त केलेली पाच ब्रास वाळू खासगी वाहनाद्वारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणून ठेवण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
संबंधित व्हिडीओ ..
