नांदेड – प्रयोगशाळा सहाय्यकांचे तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक कौशल्ये, आरोग्यविषयक जाणीव, कार्यालयीन संवाद, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तसेच सेवा नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला.
शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथील प्राचार्य डॉ. नागेश जानराव यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. जानराव यांनी, “आज येथे मिळालेले ज्ञान उद्या प्रत्यक्ष सेवेत उतरले, तरच या प्रशिक्षणाचा खरा उपयोग होईल,” असे प्रतिपादन केले.
प्रशिक्षण शिबिरात आर्थिक साक्षरता, मानवी मूल्यांचे महत्त्व, जडसंग्रह नोंदवही, भावनिक, मानसिक व सामाजिक आरोग्य, शाश्वत विकास, प्रयोगशाळा सहाय्यकांची भूमिका, जबाबदाऱ्या व गुणवत्तापूर्ण सेवा, आरोग्यदायी जीवनशैली, आहार नियंत्रण व शिस्तबद्ध दिनचर्या यावर डॉ.मोहन मैड यांनी मार्गदर्शन केले. प्रभावी व कार्यालयीन संवाद कौशल्यांवर डॉ.योगिनी सातारकर, भावनिक, मानसिक व सामाजिक आरोग्य व प्रथमोपचार या विषयावर मानसोपचार तज्ञ डॉ.मोहित सोलापुरकर, जडसंग्रह नोंदवही, भांडार पडताळणी व निर्लेखन या विषयावर प्रा.विजय उश्केवार, आरोग्यावर कामाचा ताण या विषयावर फिनिक्स हॉस्पीटलचे डॉ. अनंत सूर्यवंशी, कौशल्य विकासावर प्रा.अब्दुल हदी, तर संगणकाचा वापर व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर डॉ. संतोष चौधरी, प्रा. शीतल भोकरे व प्रा.नजमा इनामदार यांनी सखोल मार्गदर्शन केले. महाराष्ट्र नागरी सेवा नियम, कर्तव्ये, जबाबदाऱ्या व निवृत्ती लाभ याबाबत लक्ष्मण मु. जाधव यांनी सविस्तर माहिती दिली.
या प्रशिक्षणामुळे प्रयोगशाळा सहाय्यकांमध्ये आत्मविश्वास वाढला असून आरोग्य, शिस्त, वेळ व्यवस्थापन, तंत्रज्ञान व संगणक वापराबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाल्याचे प्रशिक्षणार्थींनी मनोगतातून व्यक्त केले. तसेच सेवा नियम, कर्तव्ये व निवृत्ती लाभ याबाबत स्पष्टता मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदर प्रशिक्षण शिबिर हे केवळ माहिती देणारे नसून प्रयोगशाळा सहाय्यकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, सेवाभाव वृद्धिंगत करण्यासाठी व कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरावे, अशी अपेक्षा प्रा. सुर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सहभागी प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणातील मार्गदर्शन प्रत्यक्ष कामकाजात अंमलात आणण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयोगशाळा सहायक संघटनेचे अध्यक्ष बालाजी सरोदे, प्रा. सुर्यकांत कुलकर्णी, डॉ.संतोष चौधरी, गणेश नंदे, माधव हिवरे, प्रा.संजय कंधारे, प्रा.अभय आढावे, प्रा.गणपत डक, डॉ. अनघा जोशी, प्रा.अनुराधा साळुंके, डॉ.जयंत माळाकोळीकर, राहूल पोहरे, गणेश मंचेवार, ज्योती गलांडे, शंकर परोडवाड, सुभाष मुनेश्वर, विजय फुलवळकर, वैशाली पाशिमे, ज्ञानेश्वर वानखेडे, सुबोध झडते, श्रीमती पंचफुला कुरुडे, बाबाराव हुरदुके आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी सरोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सुर्यकांत कुलकर्णी यांनी केले. सदर प्रशिक्षणामुळे शिक्षण संस्थांमधील प्रयोगशाळा व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हा संपूर्ण कार्यक्रम तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, डॉ.सुनील भामरे, सहसंचालक डॉ. धनपाल कांबळे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र, डॉ.किरण लाढाणे, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच प्रा.विजय उश्केवार यांच्या प्रेरणा व सहकार्यामुळे यशस्वीरीत्या साकार झाला.
