नांदेड – राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-2026 प्रदर्शनाच्या लोगोचे अनावरण काल 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल गिरी उपस्थित होते.
लोगो अनावरणप्रसंगी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे महा प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल गिरी यांनी या महा पशुधन एक्स्पोमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे दर्शन घडणार आहे. याशिवाय आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन, दुग्ध प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स उभारण्यात येणार असून पशुधनाचे आरोग्य, लसीकरण व वैज्ञानिक संगोपन या विषयांवर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व नागरिकांनी या महा पशुधन एक्स्पो-२०२६ मध्ये सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
