कंधार (प्रतिनिधी)- पत्नीशी सुरु असलेल्या वादानंतर सासरा मुलीला भेटण्यासाठी घरी आला असता झालेल्या वादातून जावयाने फरशीच्या तुकड्याने सासऱ्याच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केल्याप्रकरणी कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी आरोपी जावई शेख यादुल याला पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
कुरळा येथील शेख यादुल याचा विवाह फरजाना बेगम यांच्याशी झाला होता. मात्र, घरगुती कारणांवरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने फरजाना बेगम या नवऱ्यापासून विभक्त राहत होत्या. दिनांक १ जून २०१६ रोजी फर्जना बेगम यांचे वडील शेख मुस्तफा हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी कुरळा येथे आले होते. यावेळी जावई शेख यादुल व सासरे शेख मुस्तफा यांच्यात वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी शेख यादुल याने फरशीच्या तुकड्याने शेख मुस्तफा यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख मुस्तफा यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी कंधार पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ नुसार शेख यादव (रा. कुरळा) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १२५/२०१६ नोंदवला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब तसेच वैद्यकीय पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्याचे नमूद केले. त्यानुसार न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी आरोपी शेख यादुल शेख लतीफ रा.कुरूळा ता. कंधार याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गत पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. महेश कागणे यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस अंमलदार संजय मुंडे यांनी तपास व न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.
