ईस्लापूर-ईस्लापूर परिसरातील दयाळ धानोरा येथे बुधवारी (दि. 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अस्वलाने भिषण धुमाकूळ घालत सलग नऊ शेतकर्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दत्ता बळीराम जाधव या शेतकर्यांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, शेतकरी पिकाचे संरक्षण करण्यासाठी व रात्री पाणी देण्यासाठी शेतात गेले असताना अचानक अस्वलाने दत्ता बळीराम जाधव व रमेश बळीराम जाधव यांच्यावर हल्ला चढविला. बचावासाठी त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर आजूबाजूचे शेतकरी मदतीसाठी धावून आले. मात्र संतप्त अस्वलाने सलग नऊ जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे दत्ता बळीराम जाधव वय 50 वर्ष ,चंद्रसिंग शेषेराव राठोड (वय 30), शंकर तानाजी जाधव (वय 50), सुदर्शन दत्ता पवार (वय 35), पंडित जयसिंग जाधव (वय 22), विनोद शेषेराव राठोड (वय 34), अरविंद शेषेराव जाधव (वय 35), संजय दत्ता जाधव (वय 35), रमेश बळीराम जाधव (वय 45) आदी. या पैकी दत्ता बळीराम जाधव यांचा मृत्यू झाला आहे. तर चंद्रसिंग शेषेराव राठोड, शंकर तानाजी जाधव, सुदर्शन दत्ता पवार व रमेश बळीराम जाधव हे गंभीर जखमी असून चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना प्रथम उपचारासाठी शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र टोनपे यांनी दिली.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चोले, उमेश ढगे ,वनपाल बि. डी. डवरे, वनरक्षक सी. पी. गडलिंगे, बी. एम. सोनकांबळे, एम. एम. पाडदे तसेच, बिट जमादार आर. के. राठोड, ओ. एल. डीडेवार, ए. व्ही. मडावी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक माजी सैनिक प्रकाश जाधव, माजी सरपंच उत्तम नानु, यांच्यासह येथील ग्रामस्थांनीही बचाव कार्यात सहकार्य केले.अस्वलाने सलग नऊ जणांवर हल्ला केल्याची ही अत्यंत गंभीर घटना असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही किनवट तालुक्यात अस्वल हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी हल्ला झाल्याची घटना गंभीर मानली जात आहे. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकर्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी कोणी झाडावर चढून बसले आहे तर काही जण मक्यामध्ये लपून बसले असता जेसीबीच्या साह्याने या सर्व जखमींना सुरक्षित स्थळी आणले मात्र हल्ला करणारा अस्वल घटनास्थळीच ठाण पणे बसून होता मानवावर हल्ला करणार्या अस्वलाचा कायम स्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्याच बरोबर वन विभागाने तातडीने उपाय योजना कराव्यात, गस्त वाढवावी व नागरिकांना संरक्षण द्यावे, तसेच मृताच्या कुटुंबीयांना व जखमींना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.. Kanthak Suryatal Post Views: 667 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वडगाव खून प्रकरणातील दुसरा आरोपी जेरबंद; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई महापौर व उपमहापौर यांच्याकडून स्मशानभूमीची पाहणी