सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने महिलेची ६० हजारांच्या दागिन्यांची फसवणूक; आरोपी अटकेत

नायगाव परिसरातील घटना; पोलिसांकडून पुढील तपास सुरू 

नायगाव (प्रतिनिधी)- नायगाव शहरात जनावरांचा दवाखाना परिसरात सोन्याचे बिस्किट देण्याचा बनाव करून एका महिलेची सुमारे ६० हजार रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे लाल बंडी, तालुका नायगाव येथील रहिवासी निर्मलाबाई बालाजी अभंगे यांनी याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास नायगाव येथील जनावरांच्या दवाखान्याजवळील सार्वजनिक रस्त्यावर त्यांची भेट गोवर्धन गणपत गोरे (वय ३५, रा. वातानपूर, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम – नूर कॉलनी, गांधीनगर, बीड) याच्याशी झाली.

आरोपीने निर्मलाबाईंना सोन्याचे बिस्किट देण्याचा बहाणा करत त्यांना बाजूला नेले. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याचे चंपू व कानातील दागिने असा एकूण सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर नायगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा क्रमांक २८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार साई सांगवीकर करीत आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या आमिषांना बळी न पडण्याचे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!