नांदेड (प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील येडपल्ली परिसरात नदीच्या काठावर अंदाजे 10 ते 12 वर्षे वयाच्या एका बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर बालिकेची अद्याप ओळख पटलेली नसून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, येडपल्ली येथील नदीकिनारी ही बालिका मृत अवस्थेत आढळून आली. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या बालिकेची ओळख पटावी यासाठी नागरिकांच्या मदतीची गरज असून, तिचा फोटो समाजमाध्यमांवर आणि आमच्या पोर्टलवर (व्हॉट्सॲपसह) संवेदनशीलतेची जाणीव ठेवून प्रसारित करण्यात येत आहे.
ही बालिका कुणाला ओळखीची वाटल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती असल्यास, संबंधितांनी तात्काळ तेलंगणा राज्यातील येडपल्ली पोलीस ठाणे किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योग्य माहिती मिळाल्यास या बालिकेच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत व केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
