नांदेड (प्रतिनिधी)- चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीच्या डोक्यावर, मानेवर व हातांवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केल्याप्रकरणी पतीला आज जिल्हा न्यायालयात दोषी ठरवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयासमोर फिरले असतानाही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी आरोपीला दोषी जाहीर केले. दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपीला कोणती शिक्षा सुनावली जाणार, याबाबतचा निर्णय 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.
पार्टी (खु) तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथे 19 मार्च 2022 रोजी सकाळी सुमारे 8 वाजता ही धक्कादायक घटना घडली. श्यामसुंदर भावराव धमेवाड (वय 32) याने पत्नी चंद्रकला हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत हातातील कुऱ्हाडीने डोके, मान व हातांवर अनेक घाव घातले. गंभीर जखमी अवस्थेत चंद्रकला यांचा मृत्यू झाला. ही घटना त्यांच्या दोन अल्पवयीन मुली, एकीचे वय 8 व दुसरीचे 10 वर्षे यांच्या समोर घडली होती.
या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 47/2022 दाखल करण्यात आला होता. तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मिथुन सावंत यांनी करून आरोपी श्यामसुंदर धमेवाड यास अटक केली. सखोल तपासानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात खटला क्रमांक 117/2022 अन्वये सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले.
घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या मुलींनी न्यायालयात आपले जबाब बदलले असले, तरी अतिरिक्त सरकारी वकील ॲड. मोहम्मद अब्बास मोहम्मद हैदर यांनी परिस्थितीजन्य पुरावे ठोसपणे मांडले. घटनेनंतर घटनास्थळी आलेल्या साक्षीदारांसमोर आरोपीच्या हातात कुऱ्हाड असल्याचे, तसेच बायोलॉजिकल तपासणीत आरोपीच्या कपड्यांवर व कुऱ्हाडीवर महिलेचे रक्त आढळल्याचे सिद्ध करण्यात आले.मयत महिला चंद्रकलाच आहे.
आरोपीकडून कोणताही ठोस बचाव सादर करण्यात आला नाही. घटनेच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित नव्हता, असे सिद्ध करणारा पुरावा देखील सादर होऊ शकला नाही. मयत चंद्रकलेचे वडील शंकर हनुमंता राजूरवाडी यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेत किनवट येथील पोलीस कर्मचारी एन.पी. भालेराव व व्ही.जे.वाघमारे यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
