कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची वैधता करण्यासाठी २५ हजारांची लाच
नांदेड (प्रतिनिधी)-माझी जात वैधता समितीत पक्की ओळख आहे, असे ठामपणे सांगत, दोन मुलींच्या कुणबी मराठा जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी थेट दरपत्रकच उघडण्यात आले. सुरुवातीला पन्नास हजारांची मागणी, तडजोडीनंतर एका प्रमाणपत्रासाठी पंचवीस हजारांवर शिक्कामोर्तब आणि शेवटी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्या ओळखीच्या दाव्याला गजाआड पाठवले.
पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 28 जानेवारी रोजी तक्रार प्राप्त झाली. तक्रारदाराने आपल्या दोन मुलींच्या कुणबी मराठा जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी नांदेड येथील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे फाईल दाखल केली होती. याच संधीचा फायदा घेत खाजगी इसम साहेबराव नागोराव गुंडीले (वय 51, झेरॉक्स दुकान चालक) याने, माझी तिथे चांगली ओळख आणि प्रभाव आहे, असे सांगत काम करून देण्याचे आश्वासन दिले.
एक प्रमाणपत्र काढायचे असल्यास तीस हजार, तर दोन्हींसाठी पन्नास हजार रुपयेअशी उघड मागणी करण्यात आली. 29 जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी झाली. कोणाला सांगून प्रमाणपत्र काढून देता? असा प्रश्न विचारल्यावर, तुम्हाला त्याच्याशी काय करायचे? असे उत्तर देत, पंचांसमक्ष एका वैधता प्रमाणपत्रासाठी 25 हजार रुपयांची लाच मागण्यात आली.
ही रक्कम मालटेकडी रस्त्यावरील साई झेरॉक्स सेंटर येथे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. साहेबराव नागोराव गुंडीले याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर करत आहेत.
