अजित दादा बद्दलची ती बातमी ऐकल्या बरोबर माझ्यासारख्या असंख्य लोकांना हुंदका अनावर झाला. नियती,प्रारब्ध, सटवाई ने लिहिलेले असे शब्द उच्चारत अनेकांनी आपले अश्रू पुसले. माणूस जन्म हा शून्यवत ,निरर्थक आहे मग जगायचं कशाला? असा प्रश्न मनात आला.
“सत्ता म्हणजे सर्व काही नाही. निसर्ग नियमानुसार सर्वांना जावेच लागेल” अशा आशयाचे दादांचे एक भाषण युट्युब वर ऐकले होते. हे असं असताना देखील दादांची ही धडपड का चालू होती? आपणही तेच करतो. का?
युरोपमध्ये औद्योगीकीकरण आले. सोमवार ते शुक्रवार राबायचे. महिना अखेर पगार घ्यायचा. मुलांना जन्म द्यायचा. एक दिवस निवृत्त व्हायचे आणि संपायचे. विज्ञानामुळे देव, स्वर्ग, नरक या संकल्पना संपल्या. पिढ्यान पिढ्या हेच चालू आहे. मग जगायचे का हा प्रश्न युरोपमधील जनतेपुढे उभा राहिला आणि त्यातून मानवी जीवन हे शून्यवत, निरर्थक, मूल्यहीन आहे असा विचार पुढे आला. त्यालाच नाईलिजम (nihilism) शून्यवाद म्हटले जाऊ लागले. जगण्याबद्दल सगळीकडे निराशावाद बोकाळला. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेक विचारवंतांनी मांडणी केली. त्या विचार मंथनातून ” अस्तित्व वाद (existencialism)” या विचारसरणीचा जन्म झाला.” माणूस मर्त्य ( mortal) असला तरी त्याने या अर्थहीन जगात आपल्या जगण्या बद्दलचा अर्थ स्वतःच शोधावा” हा तो अस्तित्व वाद. माणसं का धडपड करतात?
शॉपेनहॉवर या विचारवंताने माणसाच्या या धडपडी मागे स्वतःची व पुढील पिढ्यांची जगण्याची दुर्दम्य इच्छा (will to live)हे कारण सांगितले. पण अशी गरज पूर्ण झाली तरी माणसाचा संघर्ष व महत्त्वकांक्षा थांबत नाही हे दिसून येते.
मोठी राजकीय सत्ता, लाखो कार्यकर्ते पाठीशी, ऐतिहासिक कुटुंबाची परंपरा, आर्थिक सुबत्ते मुळे स्वतःची व कुटुंबाची भविष्यातील चिंता संपलेली असताना दादांची 66 व्या वर्षी धडपड का? या धडपडीचे उत्तर फेडरिक नीचा /नित्से यांनी दाखवून दिले की जगण्यामागील प्रेरणा “प्रभुत्वाची/सत्तेची प्रबळ इच्छा(will to power) ही असते. प्रभुत्व हे निव्वळ राजकीय क्षेत्रा पुरते मर्यादित नसते. तर प्रत्येक माणसांमध्ये जी अंगभूत क्षमता असते ती पूर्णपणे उपयोगात आणणे यात असते. कुटुंब, समाज, जग हे तुम्हाला जगण्याचा अर्थ,प्रभुत्व, सत्ता देण्यासाठी नाही. निसर्ग त्याच्या नियमाने चालतो.
नीचा म्हणतो, कुटुंब, समाज, जग अर्थ देत नसेल तर तुमचा अर्थ तुम्ही शोधा. माणूस हा नुसतं पोटासाठी जगत नाही. नवीन पिढ्या ना जन्म देऊन त्यांच्यासाठी काम करत नाही. तर तो स्वतःमध्ये असलेली क्षमता शोधतो ते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो. अशा माणसाला तो उबरमंच/ सुपरमॅन म्हणतो.
प्रत्येक जण ज्या ठिकाणी जे काम करतो ते सर्वोत्कृष्ट असेल मग तो शेतकरी, डॉक्टर, वकील ,नोकरशहा, कामगार, गृहिणी,…. किंवा कोणतेही काम करत असेल त्या क्षेत्रातला तो सुपरमॅन असतो. असा सुपरमॅन स्वतःची अशी नीती मूल्य व्यवस्था निर्माण करतो. कोणताही एक माणूस सर्व समाजाला मान्य होईल अशी मूल्य व्यवस्था देऊ शकत नाही.
कुक्कुटपालन, डेरी, शेती करणारा दहावी पास तरुणाला संधी मिळाली आणि त्याने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत धडक मारली .आपल्या अंगातील उपजत प्रभुत्व विकसित केले त्यातून तो सुपरमॅन बनला.
हा एक अपघात आहे पण दादांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये सुपरमॅन असतो हे असंख्य मानवांना आपल्या कृतीतून दाखवून दिले. सर्व मानव जातीचे असे एक पुस्तक आहे ते कधी ना कधी जळणार आहे पण त्या अगोदर त्यातील एका पानावर आपली सुंदर कथा लिहावी असे फ्रेडरिक नीचा म्हणतो. दादाने तशा आपल्या पाऊल खुणा मागे सोडल्या.अशा अजितदादा नावाच्या सुपरमॅनला अखेरचा सलाम!
– सुरेश खोपडे
एक दादा माणूस! कोणत्या पाऊल खुणा ठेवून गेले?
