नांदेड (प्रतिनिधी) – इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या टोळीला मोठा धक्का देत एका युवकासह एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून पाच मोटरसायकली व दोन स्कुटी अशा एकूण सात चोरीच्या दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, त्यांची अंदाजे किंमत ३ लाख ५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिर्झा गुट्टे पठाण, इज्राईल, रेवणनाथ कोळनूरे, जगताप, सुखई,जावेद, गीते आणि जगताप यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, पथकाने पहेलवान टी हाऊसजवळील मिलिंद नगर परिसरात सापळा रचून शेख अली शेख बाबू (वय १९, रा. मिलिंद नगर, नांदेड) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत का, तसेच शहरातील इतर चोरीच्या गुन्ह्यांशी यांचा संबंध आहे का, याचा कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. इतवारा पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
