लोहपुरुषांचा वारसा आणि खोट्या आरोपांची फॅक्टरी ; इतिहास वाकवून सत्ता टिकते का? हा प्रश्न देशाने विचारायलाच हवा   

ज केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव पुढे करून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरोप करत असतात. हा विषय काही नवीन नाही. मात्र, इतिहासाचा आधार न घेता, अर्धसत्ये आणि उघड खोटे रेटून मांडण्याची पद्धत आता धोकादायक व संतापजनक ठरत आहे.

सरदार वल्लभभाई पटेल आपल्या कर्तृत्वामुळे ‘सरदार’ झाले. स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानिक, राजे, सरंजामदार यांना भारतात विलीन करण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले आणि म्हणूनच त्यांना ‘लोहपुरुष’ ही उपाधी मिळाली. पण हेच सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्यात तीव्र वैर होते, असा खोटा इतिहास आज मुद्दाम रंगवला जातो. प्रत्यक्षात दोघांमध्ये असलेले सामंजस्य, परस्पर सन्मान आणि सहकार्य याची असंख्य लिखित पुरावे आजही उपलब्ध आहेत. तोंडी बोलून काहीही चालत नाही; इतिहासाला पुरावे लागतात. आणि पुरावे समोर असतानाही खोटे बोलत राहणे ही आजच्या सत्तेची खास शैली झाली आहे.

स्वतःला “इतिहासाचे विद्यार्थी” म्हणवून घेणाऱ्यांना एवढेही माहीत नाही की 1960 सालातील एखादा किस्सा सांगून नेहरूंनी सरदार पटेलांना विरोध केला होता, असे सांगणे म्हणजे निव्वळ अज्ञानाचे प्रदर्शन आहे. कारण सरदार पटेल यांचे निधन 1950 साली झाले होते. मग 1960 मधला विरोध कुठून आला? हा इतिहास आहे की स्क्रिप्ट?

सत्ताबदल होण्याआधी, 27 ऑक्टोबर 2013 रोजी दैनिक भास्करमध्ये छापलेली, आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत पुन्हा पुन्हा व्हायरल केली जाते. त्यात असा दावा करण्यात आला की पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेला गेले नव्हते. हे सरळसरळ खोटे आहे. तत्कालीन पंतप्रधान नेहरू अंत्ययात्रेला उपस्थित होते, याची बातमी त्या काळात टाइम्स ऑफ इंडियाने छापली होती. इतकेच नव्हे तर राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद सुद्धा त्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपतींचे जाणे अनुचित मानले जात असतानाही ते गेले हे दोघांमधील परस्पर आदर आणि आपुलकीचे द्योतक आहे.

हेही तितकेच सत्य आहे की पंडित नेहरूंनी मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना अंत्ययात्रेला जाऊ नये, असे सांगितले होते. कारण साधे होते संपूर्ण मंत्रिमंडळ एकाच ठिकाणी गेल्यास देशाच्या कारभारावर परिणाम होऊ शकतो, ही त्यांची जबाबदारीची चिंता होती. यात चूक काय होती? फरक काय पडला? मग या निर्णयाचे विकृतीकरण करून खोटारडे आरोप का केले जात आहेत?

आज प्रश्न इतिहासाचा नाही, तर सध्याच्या कारभाराचा आहे. अब्जावधी रुपयांचा व्यवहार डॉलर खरेदी करून सिंगापूरमध्ये विकण्याचा घोळ झाला, त्यावर कोण बोलणार? रुपया घसरू नये म्हणून हे आर्थिक प्रयोग करण्यात आले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. उलट पुन्हा डॉलर विक्री करून कारभार चालवावा लागला. या प्रकरणात आरबीआयच्या प्रमुखांना का बदलण्यात आले? आज पीएमओमध्ये कोण निर्णय घेत आहे? हे प्रश्न विचारणारे कुठे आहेत?

काँग्रेस स्वातंत्र्यलढ्यात पूर्ण ताकदीने सहभागी होती, हा इतिहास पुसण्याचा आज प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीत सरदार पटेल यांना अधिक मते मिळाली होती, हे खरे आहे. पण ती मते पंतप्रधानपदासाठी नव्हती. महात्मा गांधींचे स्पष्ट मत पंडित नेहरू यांच्या बाजूने होते. कारण नेहरू हे सरदार पटेलांपेक्षा 14 वर्षांनी लहान होते आणि दीर्घकालीन नेतृत्वासाठी योग्य मानले जात होते.

सरदार पटेल अनेक आजारांशी झगडत होते. महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता. तरीही त्यांनी शेवटपर्यंत देशासाठी काम केले. आज मात्र त्यांच्या नावाचा वापर करून इतिहासाची तोडफोड केली जात आहे. आज जे लोक पंडित नेहरू सरदार पटेल यांच्या अंत्ययात्रेला गेले नव्हते, असे आरोप करतात, त्यांनी एक साधा प्रश्न स्वतःला विचारावा तुमच्यापैकी किती लोक सरदार पटेल यांच्या अंत्यसंस्कारांना गेले होते? हा प्रश्न विचारला तर देशद्रोहाचा शिक्का मारला जातो.

पंडित नेहरू,राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सोबत विमानतळावर भेटून सरदर पटेल विशेष विमानाने मुंबईला गेले होते. विमानतळावर त्यांना निरोप द्यायलाही गेले होते. उपचारादरम्यान सरदार पटेल यांचे निधन झाले आणि त्यांच्या अंत्ययात्रेत राष्ट्रपती व पंतप्रधान दोघेही उपस्थित होते. याचे फोटो, व्हिडिओ आणि वृत्तपत्रीय पुरावे आजही उपलब्ध आहेत. तरीही सर्रास खोटे बोलणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न आता वाचकांनी आणि जनतेनेच ठरवावा. इतिहासाशी खेळ करून सत्ता टिकवणे किती काळ चालणार, याचाही विचार करण्याची वेळ आता आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!