नांदेड (प्रतिनिधी)- येथील एसटी को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण ४२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक निरीक्षक सतीश प्रल्हाद गर्जे यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ११ डिसेंबर २०२५ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत नांदेड येथील एसटी को-ऑपरेटिव्ह बँक, वर्कशॉप शाखेत कार्यरत असलेले बँक अधिकारी बालाजी शिंदे यांच्यासह इतर ४१ अधिकारी व कर्मचारी, तसेच काही सभासदांनी मिळून बँकेच्या नियमबाह्य पद्धतीने कारभार केला.
आरोपींनी बनावट कागदपत्रे व खोटे व्हाउचर तयार करून बँकेच्या खात्यातून १ कोटी ९ लाख १४ हजार ५२१ रुपये अपहार करून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी दिनांक ४ जून २०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक माळी हे करीत आहेत. विशेष म्हणजे, सर्वसाधारणपणे २० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक गुन्ह्यांचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो, मात्र सदर प्रकरणाचा तपास सध्या तरी भाग्यनगर पोलीस ठाण्याकडेच सुरू आहे.
या बँके कडे पैसे देणे जास्त झाल्याने सभासदांना कर्ज दिले जात नाही. लालपरी चालवणाऱ्या काही जणांचे आणि प्रशासकीय कार्य करणाऱ्या काही जणांचे वेतन मात्र याच बँकेतून होते असे सांगण्यात आले.
