फेसबुक पोस्टवर पोलिसी धाड, खऱ्या घोटाळ्यांवर मौन: महाराष्ट्र गृह खात्याची भयावह पोलिसगिरी
महाराष्ट्र सरकार विशेषतः महाराष्ट्राच्या गृह खात्याने आपली विश्वासार्हता स्वतःच उद्ध्वस्त करण्याचा जणू विडा उचललेला आहे. या गृह खात्याचे प्रमुख गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. “ते ३५ पुरणपोळ्या खातात” असे विधान त्यांच्या पत्नीने सार्वजनिकपणे केले होते; डॉ. संग्राम पाटील ब्रिटिश नागरिक आहेत. पण या सर्व पार्श्वभूमीवर गृह विभागाचे वर्तन पाहिले तर असेच वाटते की गृह विभागाला बदनाम करण्याचे काम थेट पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.
डॉ. संग्राम पाटील या प्रकरणात जे काही घडले, त्याला केवळ “तपास” म्हणणे म्हणजे शब्दांची थट्टा ठरेल. हा मानसिक छळ आहे, आणि त्याचे संपूर्ण श्रेय महाराष्ट्राच्या गृह विभागालाच द्यावे लागेल. १० जानेवारी रोजी डॉ. संग्राम पाटील आणि त्यांच्या पत्नी लंडनहून मुंबई विमानतळावर रात्री दोनच्या सुमारास उतरले. इमिग्रेशन पूर्ण होताच मुंबई क्राईम ब्रँच, युनिट-३ ने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सुमारे १५ तास, म्हणजे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत, निरर्थक व पुनरावृत्तीपूर्ण चौकशी सुरू ठेवण्यात आली.
या चौकशीचे कारण होते १७ डिसेंबर रोजी दिलेली एक तक्रार. ही तक्रार स्वतःला “सोशल मीडिया कोऑर्डिनेटर” म्हणवणाऱ्या व्यक्तीने दिली होती. १४ डिसेंबर रोजी डॉ. संग्राम पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट केली होती. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील “शहर विकास आघाडी” या संघटनेने ती पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली. त्यावर काही प्रतिक्रिया आल्या आणि लगेचच दावा करण्यात आला की यामुळे भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याची बदनामी होत आहे.
१० जानेवारी रोजी १५ तासांच्या चौकशीनंतर डॉ. संग्राम पाटील यांना नोटीस देऊन १६ जानेवारी रोजी पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आले. ते जळगावला गेले आणि नियोजित तारखेला पुन्हा मुंबईत, क्राईम ब्रँच युनिट-३ समोर हजर झाले. तेथे पुन्हा ५–६ तासांची दुसरी फेरी चौकशी करण्यात आली.
खरे तर पहिल्याच चौकशीत डॉ. संग्राम पाटील यांनी आपण ब्रिटिश नागरिक असल्याचे स्पष्ट केले होते आणि त्याचे सर्व पुरावेही दाखवले होते. त्यामुळे पोलिसांना हे माहीत झाले होते की त्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई करता येणार नाही. तरीही काहीतरी खुसपट काढून त्रास देण्याचे सत्र सुरूच ठेवण्यात आले.
“ब्रिटिश नागरिकत्व कधी मिळाले?”,
“ब्रिटिश पासपोर्ट कधी मिळाला?”,
“फेसबुक अकाउंट कधीपासून आहे?”,
“फेसबुकचा पासवर्ड द्या”,
“मोबाईल द्या”
अशा प्रश्नांचा मारा करण्यात आला.
पोलिसांनी इतके तरी समजून घ्यायला हवे होते की १४ डिसेंबरची फेसबुक पोस्ट भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२) अंतर्गत येते की नाही, हाच मूळ प्रश्न आहे. डॉ. संग्राम पाटील यांनी पहिल्याच वेळी स्पष्ट सांगितले होते की ही पोस्ट त्यांनी स्वतः केली आहे.
त्या पोस्टमध्ये नेमके काय होते?
त्यात नरेंद्र मोदी यांच्यावर थेट काहीही लिहिलेले नाही. “मोदींच्या स्कँडलवर भाजपचे अंधभक्त आणि ४० पैशांचे ट्रोल गप्प का आहेत?” असा प्रश्न विचारण्यात आला आहे. म्हणजेच स्कँडलचा आरोप नाही, तर भक्त आणि ट्रोल यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह आहे.डॉ. सुब्रमण्यम स्वामी भाजपचेच वरिष्ठ नेते यांनी मोदींशी संबंधित अनेक मुद्दे व्यासपीठांवर, विद्यापीठांमध्ये, पॉडकास्ट्समध्ये आणि मुलाखतींमध्ये मांडले आहेत. गुजरातचे माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात अनेक गंभीर बाबी नमूद केल्या आहेत. भाजपचे विद्यमान खासदार कपिल शर्मा यांनी दिल्ली विधानसभेत केलेले भाषण आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे.
मग हे सगळे त्या तथाकथित सोशल मीडिया कोऑर्डिनेटरला माहीत नाही काय? तो ठाण्यात राहतो, तक्रार तिथे दिली जाते मग तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे कसा जातो? हा केवळ योगायोग आहे, की नियोजन?१८ जानेवारी रोजी डॉ. संग्राम पाटील आणि त्यांच्या पत्नी लंडनला परत जाणार होते. त्यावेळी त्यांना पुन्हा थांबवून सांगण्यात आले की डॉ. संग्राम पाटील यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर (LOC) काढण्यात आले आहे. कोणाच्या आदेशाने? महाराष्ट्र सरकार? महाराष्ट्र पोलीस? केंद्र सरकार? की आयबी? याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही फक्त तोंडी माहिती! ज्यांच्या प्रकरणात निकाल नाही, विजय माल्यासारख्या लोकांवर प्रभावी कारवाई नाही, त्यांच्या तुलनेत एका फेसबुक पोस्टसाठी LOC काढली जाते याला काय म्हणायचे? डॉ. संग्राम पाटील आता उच्च न्यायालयात गेले असून त्यांनी LOC आणि एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.
शेवटी प्रश्न इतकाच आहे:
“अंधभक्त गप्प का आहेत?” किंवा “४० पैशांचे ट्रोल गप्प का आहेत?” हा प्रश्न विचारल्याने नेमकी कोणाची बदनामी झाली?
कोणाविरुद्ध द्वेष पसरवला गेला?
कोणत्या दोन समाजांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले?
पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव नाही. “मोदी” म्हणजे निरव मोदीही असू शकतो, ललित मोदीही असू शकतो. पण भक्त आणि ट्रोल स्वतःच गृहीत धरतात की ‘स्कँडल वाला मोदी’ म्हणजे नरेंद्र मोदी आणि मग बदनामीचा आक्रोश करतात. म्हणजे बदनामी तुम्ही स्वतःच करता! जागतिक प्रसारमाध्यमांनी ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत, त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हा ठरत नाहीत, पण भारतात मात्र राजकीय अजेंडा राबवण्यासाठी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते.डॉ. संग्राम पाटील प्रकरण हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.
