भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान

नांदेड, दि. २४ जानेवारी:- असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले.श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला.

विराजमान प्रसंगी गुरुबाणीचे मंगल पठण, अरदास व कीर्तन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गुरुबाणीच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भारावून गेला. भाविकांनी सर्व मर्यादांचे पालन करीत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत गुरुग्रंथ साहिबांना नमन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पाणी व सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!