शासकीय अधिसूचना जारी ‘जनगणना 2027’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर

नवी दिल्ली –  देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना 2027’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात ‘घरयादी’ आणि ‘गृहगणना’ केली जाणार असून, यासाठी सरकारने 33 प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या दरम्यान आपल्या सोयीनुसार 30 दिवसांचा कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

या मोहिमेअंतर्गत नियुक्त केलेले प्रगणक घराघरात जाऊन घराची मालकी, घराचा वापर आणि घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य (छप्पर, मजला इ.) याबद्दल माहिती घेतील. तसेच कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग आणि प्रमुखाची जात (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर) याविषयीचे प्रश्न विचारले जातील. घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे, विजेची व्यवस्था, सांडपाणी निचरा, शौचालयाची उपलब्धता आणि स्वयंपाकासाठी एलपीजी किंवा पीएनजी जोडणी आहे का, याचीही नोंद केली जाणार आहे.

आधुनिक जीवनशैलीचा आढावा घेण्यासाठी यावेळी नागरिकांकडील इलेक्ट्रॉनिक साधनांचीही माहिती घेतली जाईल. यामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप, संगणक, टेलिफोन आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. त्यासोबतच कुटुंबाकडे कोणते वाहन आहे आणि आहारात कोणत्या मुख्य धान्याचा वापर होतो, हे देखील प्रगणक विचारतील.

जनगणनेच्या पुढील संवादासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांकही नोंदवला जाईल. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष प्रगणक घरी येण्यापूर्वी 15 दिवस नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृहगणना सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!