देगलूर (प्रतिनिधी) – जुने बस स्थानक देगलूर येथून करडखेडकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी गंगाबाई हुसेनी धाकपाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्या जुने बस स्थानक देगलूर येथून देगलूर–करडखेड मार्गावरील बसमध्ये प्रवासासाठी बसल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या गळ्यात सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र होते. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हे मंगळसूत्र लंपास केले. या प्रकरणी ३३/२०२६ हा गुन्हा देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार मुंडे हे करीत आहेत.
दरम्यान, बसमधील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी प्रवाशांनी प्रवासादरम्यान मौल्यवान दागिने व वस्तूंबाबत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
