राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल ; देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

नवी दिल्ली –  भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह (MyGov) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0.’ या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले असून, देशातील ‘सुपर 100’ विजेत्यांमध्ये सर्वाधिक 19 विजेते  महाराष्ट्राचे आहेत. या  विजेत्यांमध्ये 14 मुली आणि 5 मुलांचा समावेश आहे.

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत 2021 मध्ये सुरू झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या पराक्रमाची जाणीव करून देण्यासाठी राबविला जातो. यंदाच्या वीर गाथा 5.0 आवृत्तीमध्ये देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच परदेशातील 18 देशांमधील 91 सीबीएसई (CBSE) शाळांनी यात सहभाग नोंदवला, ज्यामधून परदेशातील 4 मुलांनीही विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. संपूर्ण देशातून एकूण 1.92 कोटी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चित्रकला (Painting/Drawing), कविता (Poem), परिच्छेद लेखन (Paragraph) आणि मल्टिमीडिया सादरीकरण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. प्राथमिक गटात (इयत्ता 3 री ते 5 वी) सानवी भिंगारडे (कविता), वर्धन फलके (चित्रकला), जान्हवी खोत (परिच्छेद लेखन), वेदिका कविताके (परिच्छेद लेखन), विधी वानखेडे (चित्रकला) आणि मंजुश्री घोरपडे (परिच्छेद लेखन) यांनी यश मिळवले.

माध्यमिक गटात (इयत्ता 6 वी ते 8 वी) अर्पित जाधव व सावी मुद्रळे यांनी मल्टिमीडिया प्रेझेंटेशनमध्ये, तर श्रावणी संकपाळ (कविता), शिवांक खोडे व शौर्य लेकुळे (चित्रकला), श्रेया उंबरकर, आदित्य गायकवाड आणि शमिका गवंडी यांनी परिच्छेद लेखनात बाजी मारली. उच्च माध्यमिक गटात (इयत्ता 9 वी ते 10 वी) अवनी खोरी (चित्रकला), समीक्षा मोझर (परिच्छेद लेखन), उच्च माध्यमिक गटात (इयत्ता 11 वी ते 12 वी) दीक्षा येलमार (परिच्छेद लेखन)आणि सिद्धी रामुगडे (परिच्छेद लेखन)यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला  आहे.

या सर्व 100 राष्ट्रीय विजेत्यांना नवी दिल्ली येथे आयोजित विशेष सोहळ्यात संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयातर्फे प्रत्येकी 10,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, 26जानेवारी 2026 रोजी कर्तव्य पथ येथे होणाऱ्या भव्य प्रजासत्ताक दिन संचलनाचे ‘विशेष अतिथी’ म्हणून उपस्थित राहण्याचा मानही या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!