नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस असल्याची खोटी ओळख सांगून एका ५१ वर्षीय शिक्षकाची तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावसार चौक परिसरातील सन्मान हाइट्स या इमारतीत राहणारे शिक्षक सुनील रमाकांत पाम्पटवार (वय ५१) हे दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजता जय स्वराज बारजवळील मरळक रस्त्यावरून स्कुटीवरून जात होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून आले आणि त्यांच्या स्कुटीसमोर वाहन उभे करून त्यांना अडवले. आरोपींनी आपण पोलीस असल्याची बतावणी करत, “सार्वजनिक ठिकाणी सोने घालून फिरू नका,” असे सांगून पाम्पटवार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी व सोन्याचे ब्रेसलेट असा सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला. बदल्यात आरोपींनी बनावट दागिने देऊन घटनास्थळावरून पलायन केले.
थोड्याच वेळात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाम्पटवार यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक 37/2026 दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तरी बनावट पोलिसांचा प्रताप काही केल्या थांबेना.
