तिकीट तपासणी मोहिमांतून नांदेड विभागाची नवी कामगिरी, ₹ 11.06 कोटी उत्पन्नासह नवा बेंचमार्क

नांदेड – भारतीय रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमांद्वारे महसूल निर्मितीत उल्लेखनीय कामगिरी करत एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत ₹ 11.06 कोटी इतके उत्पन्न मिळविले आहे. ही कामगिरी मागील वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत 20.23 टक्क्यांनी अधिक असून, निर्धारित उद्दिष्ट ओलांड करणारा नांदेड विभाग हा एकमेव विभाग ठरला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी विभागभर राबविण्यात आलेल्या सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध व कडक तिकीट तपासणी मोहिमांमुळे शक्य झाली आहे. वर्षभरात तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी एकाच विभागात संपूर्ण स्थानके व गाड्यांचा समावेश असलेल्या एकूण 114 ‘फोर्ट्रेस चेक’ मोहिमा राबविण्यात आल्या. याशिवाय, मोठ्या पथकांच्या सहभागातून 17 ‘मॅसिव्ह चेक’ मोहिमा घेण्यात आल्या.
कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी 7 ‘मॅजिस्ट्रेट चेक’ घेण्यात आले, तर संवेदनशील ठिकाणी अचानक तपासणीसाठी 11 ‘स्पॉट चेक’ करण्यात आले. तसेच, अनधिकृत प्रवास रोखण्यासाठी दरमहा सरासरी एक अशा ‘अ‍ॅम्बुश चेक’ व बस छापे नियमितपणे राबविण्यात आले.
या मोहिमांची प्रभावीता विक्रमी कारवाईतून स्पष्ट होते. 17 ऑक्टोबर 2025 रोजी एका दिवसात सर्वाधिक कामगिरी नोंदविण्यात आली असून, त्या दिवशी 1,581 प्रकरणे उघडकीस आणत ₹ 10,90,139 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. तसेच, ऑक्टोबर 2025 हा महिना सर्वाधिक कार्यक्षम ठरला असून, या महिन्यात 26,266 प्रकरणे नोंदवून ₹ 1,55,21,835 इतकी विक्रमी वसुली करण्यात आली.
या कारवायांसाठी 33 तिकीट तपासणी पथक कर्मचारी, 17 विभागीय कार्यालयातील कर्मचारी व 171 यात्री सुविधा कर्मचारी (कमर्शियल अमेनिटीज स्टाफ) यांनी समन्वयाने कार्य केले. यास रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
तिकीट तपासणी पथकाचे मार्गदर्शन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी केले, तर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. विजय कृष्णा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. बी. रितेश आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्री. शैलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमा यशस्वीपणे राबविण्यात आल्या.
नांदेड विभाग तिकीटविरहित व अनियमित प्रवासाविरोधात सातत्याने दक्ष राहणार असून, महसूल संरक्षण, प्रवासी शिस्त आणि न्याय्य प्रवास पद्धतीबाबत आपली कटिबद्धता कायम ठेवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!